वृत्तसंस्था/ अमृतसर
कपूरथला जिह्यातील पाडण, गाव येथे गुरुवारी रात्री आंतरराष्ट्रीय खेळाडू अरविंदरजीत सिंह याला पंजाब पोलिसांच्या एका पोलिस उपनिरीक्षक आणि त्याचा पार्टनर मंगूने गोळ्या घालून ठार मारले. त्याचा एक साथीदार गोळी लागल्याने जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या संदर्भात सुभानपूर पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी दोन जणांविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे, कबड्डीपटू अरविंदरजीत सिंग व पोलिस उपनिरीक्षक यांच्यात कोणतेही वैर नसून झालेला प्रकार हा प्रथमदर्शनी गोंधळात टाकणारा असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एएसआय आपला मित्र मंगूला गाडीतून गावी सोडण्यासाठी जात असताना रात्री दहा वाजता पाडण गावाजवळ रस्त्याच्या शेजारी गाडी दिसली. या गाडीजवळ गेले असताना आपल्यावर हल्ला होईल या भीतीने पोलिस उपनिरीक्षक परमजीत सिंगने अंदाधुंद गोळीबार केल्याने यामध्ये अरविंदरजीत सिंग जागीच ठार झाला. त्याचा साथीदार जखमी झाल्याने त्याला इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. यादरम्यान, कापुरथलाच्या पोलीस अधीक्षकांनी परमजीत सिंगला निलंबीत केले आहे. परमजीत व त्याच्या साथीदारा विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. शस्त्र आणि वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलिस अधिकाऱयांनी सांगितले.









