वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगाला कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. याला भारतही अपवाद नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व क्रीडा घडामोडी ठप्प झाल्या आहेत. लॉकडाऊनमुळे घरीच असलेल्या जनतेसाठी तंदुरुस्ती कायम राखण्यासाठी अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनने मोहीम हाती घेतली आहे.
पंतप्रधान मोदी यांनी कोरोना व्हायरसमुळे 21 दिवसांसाठी संपूर्ण देश लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. देशामध्ये कोरोनाचा प्रसार झपाटय़ाने होत आहे. बाधा झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. अशा कठीण परिस्थितीतत अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनने तंदुरुस्तीची नवी मोहीम हाती घेतली असून यामध्ये राष्ट्रीय वरि÷ पुरुष आणि महिला संघातील फुटबॉलपटू तसेच माजी फुटबॉलपटूंनी आपला सहभाग दर्शवला आहे. फुटबॉलच्या साहय़ाने तंदुरुस्ती राखण्याच्या विविध पद्धती याची माहिती हे फुटबॉलपटू देत आहेत. देशामध्ये कोरोनाची बाधा किमान 2 हजार लोकांना झाली असून बळींची संख्या 50 झाली आहे. अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनतर्फे हाती घेतलेल्या या मोहिमेवेळी भारताचा माजी फुटबॉलपटू बायचुंग भुतिया, कर्णधार सुनील छेत्री, महिला फुटबॉलपटू अवेका सिंग तसेच डी. ग्रेस यांनी जनतेला त्यांच्या घरामध्ये सुरक्षित राहण्याचे आवाहन केले. भारतातील जनता सुरक्षित असेल तर राज्य आणि त्यानंतर देशही सुरक्षित राहू शकतो, असा संदेश भारताच्या फुटबॉलपटूंनी दिला आहे. कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी देशातील जनतेने एकत्रित येऊन या संकटाला सामोरे जाणे जरुरीचे आहे, असेही त्यांनी म्हटले.









