सत्र न्यायालयाकडून 10 आरोपींची मुक्तता : आज होणार शिक्षेची घोषणा
वृत्तसंस्था / अहमदाबाद
गुजरातमधील एका न्यायालयाने 2008 च्या अहमदाबाद येथील साखळी बॉम्बस्फोटाप्रकरणी मंगळवारी 77 आरोपींपैकी 10 जणांची मुक्तता केली आहे. न्यायालयाने मागील वर्षी सप्टेंबरमध्ये सुनावणी पूर्ण केली होती. डिसेंबर 2009 मध्ये सुरू झालेल्या दीर्घ खटल्यात 1,100 साक्षीदारांची उलटतपासणी करण्यात आली. या प्रकरणी आतापर्यंत 49 जणांना दोषी ठरविण्यात आले आहे.
26 जुलै 2008 रोजी 70 मिनिटांमध्ये 21 बॉम्बस्फोट झाल्याने अहमदाबाद शहर हादरून गेले होते. शहरभर झालेल्या या स्फोटांमध्ये कमीत कमी 56 जणांना जीव गमवावा लागला होता. तर 200 जण जखमी झाले होते. स्फोटांप्रकरणी तपास अनेक वर्षांपर्यंत चालला आणि सुमारे 80 आरोपींवर खटला चालला.
इंडियन मुजाहिदीन आणि स्टुडंट्स इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडियाच्या दहशतवाद्यांनी हे स्फोट घडवून आणले होते. खटल्याशी निगडित 6000 दस्तऐवज न्यायालयासमोर मांडले गेले होते. 547 आरोपपत्रे सादर करण्यात आली होती. 77 आरोपींप्रकरणी 14 वर्षांनी युक्तिवाद पूर्ण झाला. यादरम्यान 7 न्यायाधीश बदलले, लॉकडाऊन काळातही सुनावणी सुरू होती. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून या हायप्रोफाइल खटल्याची प्रारंभिक सुनावणी साबरमती तुरुंगात झाली. बहुतांश सुनावणी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात आली होती.
यासीन भटकळ दिल्लीत कैद
दिल्लीच्या तुरुंगात कैदी यासीन भटकळवर नव्याने खटला चालविला जाणार आहे. यासीन पाकिस्तानात पळाला होता. त्याला नेपाळमधून ताब्यात घेण्यात आले होते. 77 आरोपींपैकी अहमदाबादच्या साबरमती तुरुंगात 49, भोपाळ तुरुंगात 10, मुंबईच्या तळोजा तुरुंगात 4, बेंगळूर तुरुंगात 5, केरळमधील तुरुंगात 6, जयपूर तुरुंगात 2 आणि दिल्ली तुरुंगातही आरोपी कैद आहे.









