ह्युस्टनच्या धर्तीवर अमेरिकेच्या अध्यक्षांचा कार्यक्रम शक्य : फेब्रुवारीत प्रस्तावित भारत दौरा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अमेरिकेत यंदा नोव्हेंबर महिन्यात होणाऱया अध्यक्षीय निवडणुकीत तेथे राहत असलेल्या भारतीय वंशाच्या नागरिकांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. भारतीय वंशाच्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी ह्युस्टन येथील ‘हाउडी मोदी’सारखा कार्यक्रम भारतात आयोजित केला जाऊ शकतो. अमेरिकेत गुजराती लोकांचे प्रमाण लक्षणीय असून तेथील बाजारपेठेत त्यांनी महत्त्वाचे स्थान प्राप्त केले आहे.
मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिकेच्या ह्युस्टन शहरातील अत्यंत लेकप्रिय हाउडी कार्यक्रमाच्या यशानंतर ट्रम्प देखील भाजपचा बालेकिल्ला असलेल्या गुजरातमध्ये अशाच प्रकारच्या कार्यक्रमात सामील होऊ शकतात. हा कार्यक्रम अहमदाबामध्ये आयोजित केला जाणार असल्याची चर्चा आहे.
फेब्रुवारी महिन्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रस्तावित भारत दौऱयात हे आयोजन केले जाऊ शकते. ट्रम्प यांचा अध्यक्ष म्हणून पहिलाच भारत दौरा असणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होऊ घातलेल्या या दौऱयाचा ट्रम्प यांना चांगलाच लाभ होऊ शकतो.
तयारीस प्रारंभ
ट्रम्प यांच्या भारत दौऱयातील कार्यक्रमांची रुपरेषा ठरविणाऱया काही लोकांनुसार तीन दिवसीय भारत दौऱयादरम्यान दिल्लीसह अन्य एका शहराला ते भेट देऊ शकतात. तसेच ट्रम्प हे अहमदाबाद शहराला प्राधान्य देत तेथे हाउडी मोदीसारख्या कार्यक्रमात सामील होण्याची शक्यता आहे. अशाप्रकारच्या कार्यक्रमाची प्रारंभिक तयारी सध्या केली जात आहे. आयोजकांनुसार या कार्यक्रमात ट्रम्प यांच्यासह पंतप्रधान मोदींही भाग घेणार आहेत. मोदी यांच्या सहभागामुळे या कार्यक्रमाला जल्लोषी स्वरुप प्राप्त होऊ शकते.
महत्त्वाचे करार होणार
हाउडी मोदीच्या धर्तीवर हाउडी ट्रम्प कार्यक्रमात गुजराती वंशाचे अमेरिकन नागरिक मोठय़ा संख्येत भाग घेणार आहेत. ट्रम्प यांच्या भारत दौऱयादरम्यान दोन्ही देशांदरम्यान अनेक महत्त्वाचे करार होण्याची शक्यता आहे. या करारांच्या अंतर्गत अमेरिकेच्या कंपन्यांना भारतीय बाजारपेठेत प्रवेश मिळणार आहे. तर याच्या बदल्यात अमेरिका भारताला व्यापार विषयक प्राधान्यक्रमाचा दर्जा पुन्हा प्रदान करणार आहे.
ब्रिटनचे उदाहरण
ब्रिटनमध्ये मागील वर्षाच्या अखेरीस पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय वंशाच्या नागरिकांनी मजूर पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली होती. मजूर पक्षाने भारताच्या धोरणांना विरोध दर्शवत मुस्लीम मतेपढीला महत्त्व दिले होते. या भूमिकेमुळे मजूर पक्षाला निवडणुकीत चांगलाच फटका बसला आहे. मजूर पक्षाच्या मतांमध्ये मोठी घट होत हुजूर पक्षाने निवडणुकीत इतिहास घडविला आहे. ब्रिटनच्या धर्तीवर अमेरिकेतील भारतीयांना सोबत घेण्याचा प्रयत्न ट्रम्प यांचा आहे. अमेरिकेत भारतीय समूह सधन तसेच उच्च पदांवर कार्यरत आहे. पक्षनिधीमध्ये भारतीय समुदाय महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.









