खानापूर तालुक्यातील पाली गावाजवळील घटना : कुत्र्यामुळे जीव बचावला
प्रतिनिधी /खानापूर
खानापूर तालुक्याच्या जंगल भागात अस्वलांची संख्या वाढली आहे. अशातच अस्वलाच्या हल्ल्यात जखमी होण्याच्या घटनाही घडत आहेत. अशीच घटना खानापूर तालुक्याच्या भीमगड अभयारण्य क्षेत्रातील पाली गावात रविवारी दुपारी 1 च्या दरम्यान घडली.
या गावातील शेतकरी विठ्ठल सुगधाप्पा जरंबेकर (वय 65) हे पालीपासून एक-दीड कि. मी. अंतरावर आपल्या शेतात काम करताना अचानक एक अस्वलाने विठ्ठलवर हल्ला चढविला. या हल्ल्यात त्याच्या कपाळ, हात व छातीला गंभीर इजा झाली. अस्वलाशी झटापट सुरू असतानाच विठ्ठल यांच्या कुत्र्याने अस्वलाच्या दिशेने झेप घेतली. यामुळे अस्वल घाबरून पळाले. आणि अस्वलाच्या तावडीतून विठ्ठलची सुटका झाली. जखमी अवस्थेतच विठ्ठल यांनी गाव गाठले. त्याची अवस्था पाहून गावातील प्रवीण पाटील यांनी ट्रक्समधून जखमी अवस्थेत त्यांना खानापूरला आणले. याची माहिती भाजप युवा नेते पंडित ओगले यांना मिळताच ते व त्याचे सहकारी दिनकर मरगाळे, नितीन पाटील, महादेव काद्रोळकर, रघु गुरव, नाना कुरुंदवाडकर, बन्सी कुंभार, प्रदीप देसाई यांनी तातडीने सरकारी दवाखान्याकडे धाव घेतली. आणि जखमीला प्राथमिक उपचारासाठी खानापूरच्या सरकारी दवाखान्यात दाखल केले. तातडीने डॉक्टरांनी प्राथमिक उपचार सुरू केले. त्याचवेळी उपचार सुरू असतानाच पंडित ओगले यांनी माजी विधानपरिषद सदस्य महांतेश कवटगीमठ यांच्याशी संपर्क साधला. आणि जखमीबद्दल माहिती दिली. त्याचवेळी कवटगीमठ यांच्या सूचनेवरून उपचारासाठी बेळगावच्या केएलई रुग्णालयात हलविले. केवळ कुत्र्याच्या प्रसंगावधानानेच विठ्ठल यांचा जीव वाचला. अस्वलाच्या हल्ल्यामुळे या भागातील शेतकरी वर्गात भीती निर्माण झाली आहे. वनखात्याने विठ्ठल जरंबेकर याला आर्थिक साहाय्यासह औषधी उपचारासाठी लागणारा सर्व खर्च करावा, अशी मागणी होत आहे.









