खंजर गल्लीतील सुशोभिकरण केलेल्या विहिरीच्या देखभालीकडे पाणीपुरवठा मंडळाचा कानाडोळा
प्रतिनिधी /बेळगाव
खंजर गल्ली कॉर्नर येथील बुजविलेल्या विहिरीचे पुनरूज्जीवन करून विविध भागात पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तसेच या विहिरीचा विकास करून सुशोभिकरण करण्यात आले होते. मात्र सध्या विहिरीच्या सभोवती खोकीधारकांनी ठाण मांडले असून विहिरीच्या परिसरात अस्वच्छता पसरली आहे. त्यामुळे अस्वच्छता व अतिक्रमणाच्या विळख्यात विहिरीचे सौंदर्य हरवले आहे.
शहरातील पाणी समस्या निवारणासाठी महापालिका आणि पाणीपुरवठा मंडळाने विहिरींचे पुनरूज्जीवन करण्याची मोहीम राबविली होती. याअंतर्गत खंजर गल्ली येथील विहिरीचे पुनरूज्जीवन करण्यात आले आहे. विहिरीवर जलशुद्धीकरण यंत्रणा बसवून विविध भागात पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच या भागाच्या माजी नगरसेवकांनी विहिरीच्या सुशोभिकरणासाठी महापालिकेत पाठपुरावा केला होता. त्यामुळे विहिरीच्या सभोवती कारंजे आणि विविध उपक्रम राबवून सुशोभिकरण करण्यात आले होते. याकरिता 25 लाखाचा निधी खर्च करण्यात आला होता. सुशोभिकरणानंतर व जलशुद्धीकरण यंत्र बसविल्यानंतर ही विहीर पाणीपुरवठा मंडळाकडे देखभालीकरिता हस्तांतर करण्यात आली होती.
सुशोभिकरण केलेल्या विहिरीच्या देखभालीकडे पाणीपुरवठा मंडळाने कानाडोळा केल्यामुळे संपूर्ण सौंदर्य नेस्तनाबूत झाले आहे. अशातच विहिरीच्या सभोवती विविध व्यावसायिकांनी खोकी आणि व्यवसाय थाटून अतिक्रमण केले आहे. तसेच विहिरीच्या परिसरात कचरा साचत असल्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे विहिरीचे सौंदर्य हरवले आहे. चोहोबाजूंनी खोकी थाटण्यात आल्याने विहीर गायब झाली का? असा मुद्दा नागरिक उपस्थित करीत आहेत. सौंदर्यीकरणासाठी खर्ची घालण्यात आलेला निधी वाया गेल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. त्यामुळे परिसरातील कचरा हटवून स्वच्छता करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.









