त्यांचे नाव रमेशचंद्र गंगाराम ‘बापू’ नाडकर्णी! त्यांनी गोलंदाजी सुरु केले की, समजायचे, महादुष्काळ सुरु! त्यांच्या गोलंदाजीवर धावा जमवणे म्हणजे निव्वळ अशक्य. बापू नाडकर्णी यांचे सर्वात मोठे बलस्थान म्हणजे त्यांची गोलंदाजीतील अचूकता! नाडकर्णी कसोटीसारख्या अभिजात क्रिकेटमध्ये सलग 21 षटके निर्धाव टाकण्यात यशस्वी झाले, हे त्यांच्या बिनचूक गोलंदाजीचेच एक प्रतिबिंब. या दिग्गज गोलंदाजाने एक्झिट घेतली असली तरी जागतिक क्रिकेटमधील त्यांचे योगदान प्रदीर्घ कालावधीसाठी संस्मरणात राहणारे ठरेल.
बापू नव्हे, ‘खडूस’ नाडकर्णी हीच त्यांची ओळख!
बापू नाडकर्णी हे डावखुरे फलंदाज आणि डावखुरे पारंपरिक शैलीचे फिरकी गोलंदाज. त्यांनी 1955 ते 1968 या 13 वर्षांच्या कालावधीत 41 कसोटी सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व केले आणि त्यात एका शतकासह 1414 धावा झळकावल्या. शिवाय, 88 बळी घेतले. 43 धावात 6 बळी, ही त्यांची कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी. अर्थात, गोलंदाजीतील अचूकता ही त्यांची खरीखुरी मजबुती आणि याच बळावर त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये षटकामागे 1.67 इतकी माफक इकॉनॉमी नोंदवली.
खऱया अर्थाने ते मुंबईच्या भाषेतील खडूस गोलंदाज ठरले आणि यामुळेच त्यांना बापू नाडकर्णी नावाने कमी व ‘खडूस’ नाडकर्णी नावाने अधिक ओळखले गेले!नाडकर्णी यांनी आपली पूर्ण प्रथमश्रेणी कारकीर्द फक्त मुंबईकडूनच खेळली नाही. त्यांनी महाराष्ट्र संघाचेही प्रतिनिधीत्व केले. पण, तरीही ‘खडूस’ ही उपाधी कायमपणे त्यांच्या नावाला चिकटून राहिली.
कसोटी इतिहासातील सर्वात भेदक गोलंदाजी
12 जानेवारी 1964 हा तो दिवस ज्यावेळी नाडकर्णी यांनी इंग्लंडविरुद्ध स्वप्नवत 4 स्पेल टाकले आणि यात त्यांचे पृथक्करण होते 32 षटके, 27 निर्धाव आणि फक्त 5 धावा! पहिल्या स्पेलमध्ये त्यांनी 3-3-0-0 असे पृथक्करण नोंदवले. दुसऱया स्पेलमध्ये 7-5-2-0, तिसऱया स्पेलमध्ये 19-18-1-0 असे आश्चर्यकारक मारा केला आणि शेवटच्या स्पेलमध्ये तेच सातत्य कायम राखत 3 षटके, 1 निर्धाव, 2 धावा व शून्य बळी, असा मारा केला. यादरम्यान त्यांनी सलग 131 चेंडू अर्थात 21 षटके व 5 चेंडू निर्धाव टाकले. याशिवाय, पाकिस्तानविरुद्ध कानपूर कसोटीतही त्यांनी 32-24-23-0 असे आश्चर्यकारक पृथक्करण नोंदवले.
पहिल्या दोन दिवसात काय घडले?
मद्रासमधील नेहरु (कॉर्पोरेशन) स्टेडियमवर भारत-इंग्लंड यांच्यात चौथी कसोटी दि. 10 ते 15 जानेवारी 1964 या कालावधीत (एका दिवसाच्या विश्रांतीसह) खेळवली गेली, त्यावेळी भारताने पहिला डाव 7 बाद 457 धावांवर घोषित केला होता. यात सलामीवीर-यष्टीरक्षक बुधी कुंदरनने कारकिर्दीतील सर्वोत्तम 192 धावांची खेळी साकारली तर विजय मांजरेकरनी 108 धावांचे योगदान दिले. कर्णधार पतौडी खाते उघडू शकले नव्हते. पण, दुसऱया दिवशी इंग्लंडला 90 षटके फलंदाजीची संधी मिळाली आणि त्यात त्यांनी 2 बाद 63 धावांपर्यंत मजल मारली होती.
तिसऱया दिवशी नाडकर्णीची कमाल
12 जानेवारी रोजी इंग्लंडने तिसऱया दिवसाच्या खेळाला सुरुवात केली, त्यावेळी त्यांचे अनेक खेळाडू तंदुरुस्त नव्हते. मिकी स्टीवर्ट (माजी इंग्लिश फलंदाज ऍलेक स्टीवर्टचे वडील) व यष्टीरक्षक जिम पार्क्स आजारपणामुळे खेळू शकणार नव्हते आणि प्रेड टिटमस, बॅरी नाईट हे अस्वस्थ होते. इंग्लंडसाठी अशी प्रतिकूल परिस्थिती असताना नाडकर्णी उपाहारानंतर गोलंदाजीला आले आणि त्यांनी सातत्याने अचूक टप्प्यावर मारा करत इंग्लिश गोलंदाजांना अक्षरशः जखडून टाकले.
अखेर 21 षटकानंतर एकेरी धाव निघाली!
नाडकर्णी यांनी सलग 21 षटके व 5 चेंडू निर्धाव टाकल्यानंतर धावांच्या दुष्काळाची ही कोंडी अखेर केन बॅरिंग्टनने फोडली होती. केरिंग्टनने चेंडू फटकावला आणि तो चुकूनच गॅपमध्ये गेला आणि इंग्लिश फलंदाजांनी अतिशय आनंदाने एकेरी धाव घेतली होती!
कसोटी क्रिकेटच्या लोकप्रियतेला घसरण
नाडकर्णी यांचा काळ तोच होता, ज्यावेळी नकारात्मक खेळामुळे कसोटी क्रिकेटच्या लोकप्रियतेची घसरण सुरु झाली होती. बहुतांशी फलंदाज सावध पवित्र्याला प्रथम प्राधान्य द्यायचे. त्यामुळे, कसोटी क्रिकेट रटाळ होत गेले. पण, तरीही नाडकर्णी यांच्या बिनचूक गोलंदाजीचे श्रेय त्यामुळे अजिबात कमी झाले नाही. अचूक टप्प्यावर मारा करणारा त्यांच्यासारखा दुसरा निष्णात गोलंदाज घडला नाही, हे यादरम्यान स्पष्ट झाले.
गावसकर, शास्त्री, दिलीप सरदेसाई, सारेच नाडकर्णींचे चाहते!
सुनील गावसकर हे देखील मुंबईच्या खडूस संस्कृतीदरम्यानच घडले असले तरी नाडकर्णींच्या समवेत खेळण्याची संधी त्यांना मिळाली नाही. पण, नाडकर्णी संघव्यवस्थापक म्हणून कार्यरत असताना गावसकरांना त्यांना जवळून अभ्यासण्याची संधी मिळाली. नाडकर्णी नेहमी ‘छोडो मत’चा नारा द्यायचे, हे गावसकर यांनी अलीकडेच म्हटले होते. गावसकरांप्रमाणेच, रवी शास्त्री, दिलीप सरदेसाई, सचिन हे सारे नाडकर्णींचेच चाहते!
कारण, या सर्वांनाच माहीत आहे,
असा खडूस गोलंदाज पुन्हा होणे नाही!









