करवसुलीवर मोठा परिणाम झाल्यामुळे कामगारांचे वेतन थकले
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोना आणि लॉकडाऊनमुळे केवळ सर्वसामान्यांनाच त्रास झाला नसून ग्राम पंचायतींमध्ये कामे करत असणाऱया असंख्य कर्मचाऱयांनाही विनावेतन काम करावे लागत आहे. बेळगाव जिल्हय़ातील 506 ग्राम पंचायतींपैकी अनेक पंचायतींमधील कर्मचाऱयांना गेल्या तीन ते चार महिन्यांपासून वेतन देण्यात आले नाही. यामुळे या कामगारवर्गाच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. एकीकडे राज्य सरकार आणि प्रशासनाच्यावतीने विविध योजनांची घोषणा करत असताना पंचायतींमधील या वर्गाला वेतन देण्यासाठी पैशांची चणचण भासत आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
ग्राम पंचायतींमधील कामगारांना वेतन देण्यासाठी आर्थिक समस्या निर्माण झाली आहे. यंदाच्या आर्थिक वर्षाच्या अखेरीस म्हणजेच मार्चच्या शेवटच्या आठवडय़ात कोरोनाचे संकट अधिक गडद झाल्याने लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली. यामुळे ग्राम पंचायत स्तरावर करवसुलीवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे पंचायतमधील कामगारांचे वेतनही थकले आहे.
सरकारने मंजूर केलेल्या ज्या कर्मचाऱयांची माहिती विशेष वेबसाईटवर दाखल करण्यात आली आहे, त्या कर्मचाऱयांनाच वेतन मिळत आहे. मात्र, यामध्ये संग्रहीत नसलेल्या कर्मचाऱयांचे वेतन थांबविण्यात आले आहे. अनेक ग्राम पंचायतींमध्ये अशा कर्मचाऱयांची संख्या अधिक आहे. यामुळे अशा कर्मचाऱयांना समस्या निर्माण झाली आहे.









