प्रतिनिधी/ बेळगाव
बुलकच्या बैठकीत रविवार दि. 20 रोजी सायंकाळी ग्रंथालयाचे दिवंगत कार्याध्यक्ष कै. अशोक याळगी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्रारंभी अध्यक्ष निखिल नरगुंदकर व मंगेश देऊळकर यांनी याळगी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.
यानंतर बुलकच्या सदस्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. बेळगावच्या साहित्य संमेलनाच्या आयोजनात याळगी यांचा सहभाग महत्त्वाचा होता. साहित्य वर्तुळात त्यांची खास ओळख होती. मराठीसाठीच्या लढय़ात ते आघाडीवर होते. अनेक कवी, लेखक, युवा कलाकारांना त्यांनी प्रोत्साहन दिले. बुलकच्या माध्यमातून त्यांनी अनेक नवीन व्याख्याते पुढे आणले, असे मत यावेळी व्यक्त झाले.
लोकमान्य ग्रंथालयाचे नाव आज बेळगावसह महाराष्ट्रातही पोहोचले आहे. ते याळगी यांच्या परिश्रमाने व उपक्रमानी वाङ्मय संघाची सुधारणा, वरेरकर नाटय़ संघात त्यांचा सहभाग, मुलांसाठी ग्रंथपेटी अशा अनेक योजना त्यांनी आणल्या. वाचन संस्कृतीसाठी ते कार्यरत राहिले, अशा भावनाही व्यक्त केल्या.
याप्रसंगी अनिरूद्ध ठुसे, किशोर काकडे, सतीश पाटील, चैतन्य हलगेकर, आरती आपटे, गुणवंत पाटील, मेधा मराठे, अंकिता कदम, जितेंद्र रेडकर, रंजना कारेकर, गुरुनाथ कुलकर्णी, रोहण दळवी आदी उपस्थित होते.
बाग परिवार
बेळगाव येथील बाग परिवारातील कवी, कवयित्री व मंडळाचे कर्मचारी यांच्यावतीने कै. अशोक याळगी यांना वाङ्मय चर्चा मंडळ येथे श्रद्धांजली वाहण्यात आली. मराठी भाषेसाठी संपूर्ण हयात खर्ची घातलेल्या निर्भिड पत्रकार याळगी यांनी पत्रकारिता व खेडय़ापाडय़ातील साहित्य संमेलनांसाठी दिलेल्या योगदानाबद्दल विशेष उल्लेख करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
याप्रसंगी अस्मिता अळतेकर, दौलत राणे, विजया उरणकर, चंद्रशेखर गायकवाड, अनगोळकर, प्राचार्या मनीषा नाडगौडा, स्मिता किल्लेकर, राधिका नवलगुंद, डॉ. मेघा भंडारी, रोशनी हुंदे, भरत गावडे, संदीप मुतगेकर व मधू पाटील उपस्थित होते..









