सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात लहानांपासून मोठय़ांपर्यंत प्रत्येकालाच ताणतणाव, चिंता, काळजीने ग्रासलं आहे. ताणतणाव आपल्या आरोग्यावर परिणाम करत असतात. ताण, चिंता, काळजी हे सगळे मानसिक आजार आहेत. त्यावर औषधंही आहेत. मात्र औषधांसोबतच आहारात काही पदार्थांचा समावेश केल्यास अधिक लाभ होऊ शकतो. अस्वस्थता दूर करण्यासाठी कोणत्या पदार्थांचं सेवन करायला हवं, याविषयी…

* ओमेगा थ्री फॅटी ऍसिड्समुळे ताणतणाव कमी व्हायला मदत होते. काही मासे ओमेगा थ्रीचा स्रोत असतात. तसंच कॉडलिव्हर ऑईलमध्येही हा घटक असतो. यासोबतच यात ‘अ’ आणि ‘ड’ जीवनसत्त्वही असतं. हे पोषक घटक तणावांना दूर ठेवतात.
* हळदीतला करक्युमिन नावाचा घटक खूपच लाभदायी ठरतो. करक्युमिनमुळे शरीरात नवा उत्साह संचारतो. चिंता, काळजी दूर होते आणि आपण ताजेतवाने होतो.
* दह्यातले उपयुक्त बॅक्टेरिया मेंदूवर सकारात्मक परिणाम करतात. दही तसंच इतर आंबवलेल्या पदार्थांमुळे ताण कमी होतो आणि आपल्याला आनंदी, उत्साही वाटतं. * अंडय़ात प्रथिनं आणि ‘ड’ जीवनसत्त्व असतं. विविध अवयवांसाठी आवश्यक असणारे अमिनो ऍसिड्सही यात असतात. अंडय़ातील ‘ट्रिप्टोफॅन’ हा घटक ‘सेरोटोनिन’ची निर्मिती करतो. ‘सेरोटोनिन’ हे रासायनिक ‘न्यूरोट्रान्समीटर’ असून यामुळे मूड चांगला होतो. याचा झोप तसंच आपल्या वागण्यावरही परिणाम होतो. त्यामुळे मानसिक आरोग्य उत्तम राहतं. ताणतणाव दूर होतात.









