तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर शहर अवैध धंद्यांच्या विळख्यात अडकलेला आहे. याला इथले लोकसेवक, लोकप्रतिनिधी आणि यांच्याशी मिलीभगत असणारी प्रशासकीय यंत्रणा कारणीभूत आहे. समाजाला अवैध धंद्याचे विष पाजणारे लोक स्वतःला समाजसेवक संबोधतात. हीच या लोकशाहीची मोठी शोकांतिका आहे. मटका, जुगार, सावकारी, डान्सबार हे सगळे अवैध धंदे म्हणजे समाजाला लागलेला कर्करोग आहे. याचा अंत अत्यंत भयानक, भीषण असून यातून श्रमिकाला कायमस्वरूपी बाहेर काढण्यासाठी लोक प्रबोधनाची गरज आहे. म्हणून अवैध धंद्यांच्या विरोधात २ ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघाच्यावतीने १ लाख सह्यांचे निवेदन राज्यपाल, मुख्यमंत्री यांना समक्ष भेटून देणार असल्याची घोषणा आडम यांनी केली. आज मंगळवार दि. २९ सप्टेंबर रोजी दत्त नगर लाल बावटा कार्यालय येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी माकपाचे ज्येष्ठ कामगार नेते तथा माजी आमदार कॉ. नरसय्या आडम बोलत होते.
ते बोलताना पुढे म्हणाले कि, केंद्र सरकार पूर्णतः जनतेच्या विरोधात रणशिंग फुंकले असून बेबंदशाही राज्य कारभार करत आहेत. कामगारांनी रक्त सांडून प्रमुख ४४ कामगार कायदे मिळविले. ते कायदे पायदळी तुडवत कॉर्पोरेट कंपन्यांना मनमानी कारभार करण्यासाठी आवश्यक असणारे कायदे अस्तित्वात आणले आहेत. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे ४४ कायद्यांचे फक्त ४ कायद्यात रुपांतर केले. तसेच कृषी व्यवसाय हा या देशाचा अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. तो पूर्णपणे मोडण्यात आला. शेतकऱ्यांच्या विरोधात ४ विधेयके पारित करून धनिक धार्जिण्य चेहरा देशापुढे दाखवून दिला. याला देशभरातून विरोध होत असून कामगार, शेतकरी रस्त्यावर उतरला तरीही सरकार मुगगिळून गप्प का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ही लांब पल्याची लढाई असून जनतेला विश्वासात घेऊन आम्ही टप्प्या टप्प्याने आंदोलनाचा पवित्रा अधिक आक्रमक करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
तसेच सोलापूर शहर हे कष्टकरी कामगारांचे शहर आहे. या शहरात विडी कामगार, यंत्रमाग कामगार, शिलाई कामगार, बांधकाम कामगार, रिक्षा चालक, उपहारगृहात काम करणारे कामगार, फळभाजी विक्रेते, फेरीवाले, चारचाकी वाले विशेष म्हणजे सुशिक्षित तरुण वर्ग असे अनेक विविध संघटीत, असंघटीत क्षेत्रात काम करणारे कामगार मटका व्यवसायाच्या आहारी गेलेले आहेत. बदलत्या काळानुसार या व्यवसायात आधुनिक बदल करून ऑनलाईन पद्धतीने मटका व्यवसाय एजेंट मार्फत चालू आहे. वास्तविक पाहता, अवैध धंदे आणि संघटीत गुन्हेगारी पासून समाजाला सुरक्षित ठेवणे, शांतता आणि सुव्यस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासकीय यंत्रणा आणि न्याय व्यवस्था निर्माण केलेली आहे. जर समाजातील दांभिक, गुंड, गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक अवैध मार्गाने मलिदा कमवण्यासाठी आणि सामाजिक संतुलन बिघडवण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि सरकारी यंत्रणेचा वापर करत असतील तर हा दोष कुणाचा ?
एका रात्री श्रीमंत बनवण्याची खोटी स्वप्ने दाखवून आठवडाभर केलेल्या श्रमाची पुंजी गिधाडासारखे उचलून नेणारा मटका व्यवसाय कुणाच्या कृपाशीर्वादाने वर्षानुवर्षे चालत आहे, याची पूर्ण माहिती यंत्रणेकडे आहे.कारण यात लोकप्रतिनिधी, पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे हात काळे झालेले आहेत. त्याशिवाय हा गोरखधंदा चालतोच कसा?
सोलापूर शहरात मोठ्या प्रमाणात संघटीत गुन्हेगारी, सराईत गुंड आणि समाजकंटक यात वाढ होत आहे. याचा दूरगामी परिणाम सुसभ्य समाजावर होत असून सामाजिक अभिसरणाच्या प्रक्रियेला बाधा निर्माण होत आहे. त्यात कष्टकरी कामगारांची मटका व्यवसायाच्या माध्यमातून होणारी लयलूट तातडीने थाबली पाहिजे. मटका व्यवसाय आणि मटका चालक याला खतपाणी घालणारे लोकप्रतिनिधी, लोकसेवक आणि प्रशासकीय अधिकारी यांची जी साखळी आहे. ती साखळी जलदगतीने तोडून सोलापूर शहर गुन्हेगारी मुक्त, अवैध धंदे मुक्त करण्यासाठी गांभीर्याने पावले उचलावी. वास्तविक परिस्थिती लक्षात घेऊन पोलीस प्रशासनामार्फत निपक्षपाती चौकशी आणि दोषींवर कडक कारवाई करावी. अन्यथा सबंध मटका, जुगार, अवैध धंदे यापासून पिडीत असलेल्या कुटुंबीय, समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती, विविध सामाजिक संघटना आणि सामाजिक चळवळीत कार्यकर्ते यांना घेऊन महाराष्ट्र राज्यभर आंदोलन छेडणार असल्याची माहिती दिली. या पत्रकार परिषदेस अॅड. एम.एच.शेख, युसुफ शेख (मेजर), विक्रम कलबुर्गी आदि उपस्थित होते.