पिकांचे मोठे नुकसान, हवेत गारवा, भितीचे वातावरण
प्रतिनिधी/ बेळगाव
गेल्या चार दिवसांपासून अवकाळी पावसाने साऱयांचीच झोप उडविली आहे. या पावसामुळे सर्व पिके खराब झाली आहेत. अनेक शेतकऱयांनी कापून ठेवलेले भात पिक पाण्यावर तरंगत आहेत. तर काही शेतकऱयांच्या मळण्या देखील पावसात अडकल्या आहेत. हातातोंडाला आलेले हे पिक वाया गेले आहे. याचबरोबर जोरदार पाऊस पडत असल्याने जनतेच्या मनामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. ज्या दिवसात थंडी पडायची होती त्या दिवसांत पावसाचा गारवा सहन करावा लागत आहे, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.
पावसामुळे शेतकरी अक्षरशः हतबल झाला आहे. मंगळवार दि. 9 रोजी रात्री पडलेल्या अवकाळी दमदार पावसामुळे अक्षरशः साऱयांचीच दाणादाण उडविली होती. त्यानंतर इतर दिवशीही अधूनमधून दमदार सरी कोसळत आहेत. शुक्रवारी रात्री दमदार पाऊस पडला आहे. या पावसामुळे वीज पुरवठा वारंवार खंडीत होत आहे. सध्या सुगीच्या कामात शेतकरी गर्क होते. मात्र याच काळात हा पाऊस आल्याने बळीराजाने कापून ठेवलेली भात पिक, पाण्यावर पोहोताना दिसत आहेत. याचबरोबर उभ्या पिकामध्ये गुडघाभर पाणी साचून आहे. शेतकऱयांनी रचून ठेवलेल्या भाताच्या गंजीतही पाणी शिरले आहे. त्यामुळे शेतकऱयांना मोठा फटका बसला आहे.
यावषी पावसाने मध्यंतरी चांगली साथ दिली होती. त्यामुळे पिके जोमात होती. आता भात कापणी करत असताना हा पाऊस आल्यामुळे समस्या निर्माण झाली आहे. शेतकऱयांनी वर्षभर कोळपण, भांगलण ही कामे करुन भात पिक जोमात आणली होती. मध्यंतरी रोगाचा प्रादुर्भाव झाला. मात्र औषधाची फवारणी केली होती. सध्या भात पिक तसेच इतर पिके जोमात होती. तालुक्मयातील काही भागामधील शेतकऱयांनी भात कापणी करुन मळणीच्या कामाला सुरुवात केली होती. तर काही भागामध्ये भात कापणी सुरु आहे. असे असताना अवकाळी पावसाने अचानकपणे जोरदार पाऊस पडत असल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे.
या अवकाळी पावसामुळे हिवाळय़ाच्या दिवसातच छत्री आणि रेनकोटचा आधार घ्यावा लागत आहे. शनिवारी झालेल्या या दमदार पावसामुळे बाजारपेठेतील जनजीवन विस्कळीत झाले होते. खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना भीजतच खरेदी करावी लागत होती. तर फेरीवाले, बैठे व्यापारी यांनाही पावसाचा त्रास सहन करावा लागत आहे. एकूणच या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून हवेत कमालीचा गारवा निर्माण झाला आहे.









