गुरुग्राम मुंबईतील कार्यालये बंद : कर्मचाऱयांना नोटिसीद्वारे माहिती
वृत्तसंस्था/मुंबई
भारत आणि चीन यांच्यातील सीमा संघर्षाच्या वादामुळे मागील काही दिवस दोन्ही देशांमध्ये तणाव राहिला होता. परंतु काही प्रमाणात दोन्हींकडून चर्चा करुन शांतता निर्माण करण्याचा प्रयत्न आजही केला जात आहे. परंतु यावर मात्र भारताने चीनची व्यापारामध्ये कोंडी करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.
चीनच्या 59 ऍपवर प्रतिबंध लावण्याचा घेतलेला केंद्राने निर्णय कौतुकास्पद म्हणावा लागेल. सदरच्या घटनेचे पडसाद आता देशातील विविध चिनी व्यापारावर पडत आहेत. यामध्ये सध्या चीनची सर्वात मोठी ई कॉमर्स कंपनी अलिबाबाने भारतामधील युसी ब्राउझर, वीमॅट आणि युजी न्यूज याचा व्यवसाय बंद केला आहे. युसी ब्राउझरच्या कर्मचाऱयांना औपचारिक पद्धतीने सांगण्यात आले की, कंपनी आपला भारतामधील व्यवसाय बंद करणार आहे. कंपनीने गुरुग्राम आणि मुंबईमधील कार्यालये बंद केली आहेत. कंपनीने 15 जुलै रोजी कर्मचाऱयांना एक नोटिस पाठवून ही माहिती दिली आहे. सदरच्या पत्रात म्हटले आहे की कंपनी हा निर्णय भारत सरकारकडून युसीवेब आणि वीमॅटवर लावण्यात आलेल्या प्रतिबंधामुळे घेतल्याचे कंपनीने म्हटले आहे.
सरकारी निर्णयाचे पालन
युसीवेबने एका माहितीत असे म्हटले आहे, की सरकारच्या आदेशाचे पालन आम्ही केले असून त्यानंतरच भारतामधील सेवा बंद केल्या आहेत. परंतू यावर अलिबाबाने कोणतीही टीप्पणी करण्यास नकार दिला आहे.









