4 महिन्यात सर्वाधिक वृद्धी : फेब्रुवारीत बेरोजगारी दर 7.78 टक्के
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
रोजगाराच्याबाबतीत सरकारसाठी धक्कादायक बातमी आहे. भारतात बेरोजगारीचा दर फेब्रुवारीमध्ये वाढून 7.78 टक्क्यांवर पोहोचला असून, जो ऑक्टोबर 2019 नंतर सर्वाधिक आहे. यापूर्वी जानेवारीमध्ये बेरोजगारी दर 7.16 टक्के होता. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकोनॉमीकडून (सीएमआयई) सोमवारी ही आकडेवारी सादर करण्यात आली. ही आकडेवारी अर्थव्यवस्थेतील सुस्तीमुळे दर्शविण्यात आल्याचे म्हटले आहे.
सप्टेंबर ते डिसेंबर 2019 च्या चार महिन्यात बेरोजगारीचा दर 7.5 टक्क्यांपर्यंत होता. तर बेरोजगारीचा दर ऑगस्ट आणि ऑक्टोबर 2019 मध्ये 8 टक्क्यांवर गेला होता. भारतीय अर्थव्यवस्था 2019 च्या शेवटच्या तिमाहीत गेल्या 6 वर्षापेक्षाही सर्वाधिक हळुवार गतीने वाढली आहे. कोरोना विषाणूच्या जागतिक स्तरावरील उद्रेकामुळे आशियाची तिसरी मोठी अर्थव्यवस्था यापुढेही मंदीत राहणार, असा विश्लेषकांचा अंदाज आहे.
ग्रामीण क्षेत्रातील बेरोजगारीत वाढ
ग्रामीण क्षेत्रातील बेरोजगारी दर गेल्या महिन्याच्या 5.97 टक्क्यांच्या तुलनेत फेब्रुवारीत वाढून 7.37 टक्के झाला आहे. तर शहरी क्षेत्रात हा दर 9.70 च्या तुलनेत घसरून 8.65 वर आला आहे, असे सीएमआयईच्या आकडेवारीतून सांगण्यात आले आहे.
पीएमआय 8 वर्षांच्या
उच्चतम स्तरावरून घसरला
जगातील काही देशांत कोरोना विषाणू पसरण्याचा परिणाम फेब्रुवारी महिन्याच्या दरम्यान भारतातील उत्पादन निर्मिती क्षेत्रावर पाहायला मिळाला. या दरम्यान उत्पादन क्षेत्रात काहीशी नरमाई पाहायला मिळत आहे. सोमवारी सादर केलेल्या मासिक सर्वेक्षणात ही बाब स्पष्ट झाली आहे. आयएचएस मार्केट इंडियाच्या उत्पादन क्षेत्राचा खरेदी व्यवस्थापक निर्देशांक (पीएमआय) फेब्रुवारी 2020 मध्ये 54.5 अंकांवर राहिला. हा आकडा जानेवारीच्या 55.3 अंकांपेक्षा कमी आहे. जानेवारीत हा 8 वर्षात सर्वाधिक उंचीवर होता.









