वृत्तसंस्था/ ब्युनोस आयरीस
2022 साली कतारमध्ये होणाऱया फिफा विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेच्या पात्रफेरी सामन्यांना प्रारंभ झाला असून गुरुवारी येथे झालेल्या सामन्यांत लायोनेल मेस्सीच्या नेतृत्वाखालील अर्जेंटिना संघाने आपली विजयी सलामी दिली. या सामन्यात अर्जेंटिनाने इक्वेडोरचा 1-0 अशा गोलफरकाने निसटता पराभव केला.
गुरुवारचा हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत रंगतदार झाला. या सामन्यात मिळालेल्या पेनल्टीवर मेस्सीने गोल नोंदविला. 12 व्या मिनिटाला अर्जेंटिनाला पंचांनी पेनल्टी बहाल केली. मेस्सीने या संधीचा अचूक फायदा घेत आपल्या संघाला आघाडीवर नेले. विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेच्या आतापर्यंत झालेल्या उभय संघातील आठ सामन्यांमध्ये अर्जेंटिनाला केवळ एका सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. या विजयामुळे अर्जेंटिनाला 3 गुण मिळाले. आता अर्जेंटिना संघाचा या पात्रफेरीच्या स्पर्धेतील पुढील सामना येत्या मंगळवारी ला पाझ येथे बोलिव्हिया संघाबरोबर होणार आहे. तर इक्वेडोरचा पुढील सामना उरुग्वेबरोबर खेळविला जाईल. उरुग्वेने या स्पर्धेतील आपल्या सलामीच्या सामन्यात चिलीचा 2-1 असा पराभव केला. दक्षिण अमेरिकेतील दहा संघांच्या या गटातील पहिले चार संघ 2022 साली कतारमध्ये होणाऱया फिफाच्या विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेसाठी थेट पात्र ठरतील तर पाचव्या संघासाठी आंतरविभागीय प्लेऑफ सामना खेळविला जाईल.









