वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
बर्फाचा खजिना म्हटल्या जाणाऱया हिमालयातील हिमखंड वितळू लागल्याचा गंभीर परिणाम आता समुद्रावरही दिसू लागला आहे. अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाच्या अध्ययनात हिमालयाचा बर्फ वितळू लागल्याने अरबी समुद्रात मोठय़ा प्रमाणावर विषारी हिरव्या रंगाचे शेवाळ फैलावू लागल्याचे समोर आले आहे. भारत, पाकिस्तान आणि आखाती देशांच्या किनाऱयावर फैलावलेले हे शेवाळ अत्यंत विशाल असल्याने अंतराळातून ते सहजपणे दृष्टीस पडत आहे.
समुद्रात आढळले जाणारे शेवाळ नॉकटिल्युका स्किनटिल्लनस अरबी समुद्राच्या किनारी भागात अत्यंत वेगाने पसरत आहे. नॉकटिल्युका स्किनिटल्लनसला ‘सागरी चमक’ असेही म्हटले जाते. रात्रीच्या वेळी हा शेवाळ अत्यंत चमकतो. हा शेवाळ एक मिलिमीटरचा असो आणि किनारी भागाच्या पाण्यात सहजपणे जिवंत राहू शकतो. हा हिरवा शेवाळ समुद्रात मोठय़ा प्रमाणात एकत्र येत असल्याने अंतराळातूनही तो दिसू लागला आहे.
15 कोटी लोकांवर संकट
सागरी चमक म्हटल्या जाणाऱया या शेवाळाबद्दल 20 वर्षांपूर्वीपर्यंत काहीच माहिती नव्हती. परंतु आता हा शेवाळ अत्यंत वेगाने भारत, पाकिस्तान आणि अन्य आखाती देशांच्या किनाऱयावर अत्यंत वेगाने फैलावत आहे. या शेवाळांमुळे अरबी समुद्राच्या खाद्यसाखळीत महत्त्वाची भूमिका बजावणारे घटक संकटात सापडले आहेत. या विषारी शेवाळामध्ये अरबी समुद्रातील माशांच्या अस्तित्वावर संकटाचे ढग घोंगावू लागले आहेत.
हिमालय कारणीभूत
हिमालय आणि तिबेटच्या पठारावर सातत्याने कमी होत असलेल्या बर्फामुळे अरबी समुद्राचा पृष्ठभाग तप्त होत आहे. या कारणामुळे हा शेवळा अत्यंत सहजपणे आता किनारी भागांमध्ये वेगाने सरकत आहे. नासाच्या उपग्रहाद्वारे प्राप्त छायाचित्रांमुळे नॉकटिल्युका स्किनटिल्लनसचा थेट संबंध हिमखंड वितळणे आणि कमकुवत मान्सूनशी असल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्वसाधारणपणे हिमालयातून येणाऱया थंड वाऱयांमुळे अरबी समुद्राचा पृष्ठभाग थंड व्हायचा. परंतु हिमखंड वितळू लागल्याने हे प्रमाण कमी होत चालले आहे.
थायलंडपासून आफ्रिकेपर्यंत फैलाव
हवामान बदलाशी संबंधित हा सर्वात नाटय़मय बदल दिसून आला आहे. नॉकटिल्युका स्किनटिल्लनसला दक्षिणपूर्व आशियातील थायलंड आणि व्हिएतनाम तसेच आफ्रिकेतील सेशेल्समध्ये पाहण्यात आले आहे. तसेच ही आता मोठी समस्या ठरत असल्याचे उद्गार नासाशी संबंधित संशोधक जोयक्युइम गोज यांनी काढले आहेत. 1990 च्या दशकात पहिल्यांदा हा शेवाळ आढळला होता. या शेवाळामुळे खाद्यसाखळीसह पाण्याची गुणवत्ताही खराब होत आहे. तसेच माशांचा मृत्यू होत आहे.









