विमाने-शस्त्रास्त्र खरेदी थांबवल्याच्या वृत्ताचे संरक्षण मंत्रालयाकडून खंडन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या शुल्कानंतर भारताने अमेरिकेकडून शस्त्रास्त्रे आणि विमानांची खरेदी थांबवल्याच्या वृत्तांचे संरक्षण मंत्रालयाने खंडन केले आहे. खरेदी करार थांबवल्यासंबंधीचे अहवाल खोटे आणि बनावट आहेत, असे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. काही माध्यमांच्या वृत्तांतामध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या 50 टक्के शुल्कानंतर भारताने अमेरिकेकडून नवीन शस्त्रs आणि विमानांची खरेदी थांबवल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यानंतर संरक्षण मंत्रालयाने सदरचे वृत्त फेटाळले आहे.
भारताने अमेरिकेसोबत संरक्षण खरेदीची चर्चा थांबवल्याचे वृत्त खोटे आणि बनावट असल्याचे सांगतानाच विविध खरेदी प्रकरणांमध्ये सध्याच्या प्रक्रियेनुसार प्रगती होत असल्याचे स्पष्ट केले आहे. ट्रम्प प्रशासनाने सुरुवातीला भारतावर 25 टक्के कर लादला होता. हा कर 7 ऑगस्टपासून लागू झाला आहे. याशिवाय, 25 टक्के अतिरिक्त कर लादण्यात आला असून तो 21 दिवसांनी म्हणजेच 27 ऑगस्टपासून लागू होईल. अशाप्रकारे, भारतावरील एकूण कर 50 टक्क्यांवर पोहोचला आहे. अमेरिकेने कोणत्याही देशावर लादलेल्या सर्वाधिक करांपैकी एक आहे.
अमेरिकेच्या या अतिरिक्त कर ओझ्यामुळे भारताने कडक धोरण अंगिकारल्याची चर्चा माध्यमांमध्ये पसरली होती. त्याच अनुषंगाने, अधिकृत सूत्रांच्या हवाल्याने भारताने नवीन अमेरिकन शस्त्रास्त्रे आणि विमाने खरेदी करण्याची योजना पुढे ढकलल्याची वार्ता पसरली होती. हे संरक्षण करार सुमारे 31,500 कोटी रुपयांचे आहेत. भारत येत्या आठवड्यात काही खरेदी व्यवहार निश्चित करण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना वॉशिंग्टनला पाठवण्याची योजना आखत होता, परंतु दोन अधिकाऱ्यांनी हा दौरा रद्द करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.
भारत आणि अमेरिका यांच्यात मोठे व्यवहार प्रगतीपथावर आहेत. भारतीय नौदलासाठी 6 बोईंग पी8आय टोही विमाने आणि सपोर्ट सिस्टीम खरेदी करण्याची घोषणा करण्याची योजना देखील आखत होते. प्रस्तावित 3.6 अब्ज डॉलर्सच्या करारात या विमानांच्या खरेदीवरील वाटाघाटी अंतिम टप्प्यात होत्या. ट्रम्प आणि मोदी यांनी फेब्रुवारीमध्ये त्यांच्या खरेदी आणि संयुक्त उत्पादनाच्या योजना पुढे नेण्याची घोषणा केली होती.








