सद्यस्थितीत निवडणूक झाल्यास बायडेन होणार पराभूत
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अफगाणिस्तानातून सैन्य हटविण्याच्या निर्णयामुळे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांना चांगलाच फटका बसला आहे. त्यांच्या लोकप्रियेत प्रचंड घसरण झाली आहे. यावरून इमरसन कॉलेजकडून एक सर्वेक्षण करविण्यात आले. या सर्वेक्षणानुसार सद्यकाळात अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक झाल्यास बायडेन यांना माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पराभूत करतील.
सुमारे 47 टक्के लोकांनी ट्रम्प यांच्या बाजूने स्वतःचे मत व्यक्त केले आहे. तर 46 टक्के लोक बायडेन यांनाच अध्यक्षपदी पाहू इच्छितात. हे सर्वेक्षण 30 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या कालावधीत करण्यात आले होते. बायडेन आणि ट्रम्प यांच्यापैकी 2024 मध्ये सर्वोच्च पदासाठी एकाची निवड करण्यास सांगण्यात आल्यास कुणाला पसंती देणार अशी विचारणा लोकांना करण्यात आली होती. डेमोक्रेट्सपैकी 60 टक्के जण बायडेन यांना 2024 मध्ये अध्यक्षीय उमेदवार म्हणून पाहू इच्छित आहेत. 2024 मध्ये ट्रम्प हे रिपब्लिकन उमेदवार असावेत असे रिपब्लिकन्सपैकी 67 टक्के जणांचे मानणे आहे.
अफगाणिस्तानातील स्थिती हाताळण्यासाठी ट्रम्प यांनी योग्य पावले उचलली होती असे 17 ऑगस्ट रोजी झालेल्या सर्वेक्षणात 25 टक्के लोकांनी म्हटले होते. तर 60 टक्के लोकांनी सैन्य माघारीच्या निर्णयाबद्दल निराशा व्यक्त केली होती. तेव्हा बायडेन यांची लोकप्रियता 49 टक्क्यांवर होती. तर एप्रिल महिन्यात 53 टक्के होती. नोव्हेंबर 2022 मध्ये अमेरिकेत मध्यावधी निवडणूक होणार असून यात प्रतिनिधिगृह आणि सिनेटच्या जागा सामील आहेत.









