वृत्तसंस्था / वॉशिंग्टन
अमेरिकेचे विदेशमंत्री माईक पॉम्पियो शुक्रवारी 7 देशांच्या दौऱयावर रवाना होणार आहेत. अध्यक्ष ट्रम्प यांच्याप्रमाणेच पॉम्पियो देखील सत्तांतर मान्य करण्यास तयार नाहीत. सत्ता हस्तांतरणाची कुठलीच गरज भासणार नाही, सत्ता हस्तांतरण तर होणार, परंतु ट्रम्प हेच अध्यक्ष राहतील, असे त्यांनी म्हटले आहे. तर पॉम्पियो फ्रान्स, तुर्कस्तान, जॉर्जिया, इस्रायल, कतार, संयुक्त अरब अमिरात आणि सौदी अरेबियाच्या दौऱयावर जाणार आहेत.
अमेरिकेचे नवे अध्यक्ष ज्यो बायडेन 20 जानेवारी रोजी शपथ घेणार आहेत. परंतु ट्रम्प प्रशासनाचे मंत्री स्वतःच्या कामात व्यग्र आहेत. 13-23 नोव्हेंबरदरम्यान 7 देशांचा दौरा करणार आहे. यादरम्यान प्रत्येक देशाशी स्वतंत्रपणे चर्चा होणार असून मुद्देही वेगवेगळे असणार आहेत. मध्यपूर्वेत शांतता प्रस्थापित करण्यासाठी आम्ही अनेक ऐतिहासिक प्रयत्न केले आहेत, असे उद्गार पॉम्पियो यांनी काढले आहेत.
पॉम्पियो सर्वप्रथम फ्रान्सच्या दौऱयावर जाणार आहेत. या दौऱयात ते अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी संरक्षण विषयक मुद्दय़ांवर चर्चा करतील. फ्रान्समध्ये काही दिवसांपूर्वी दोन दहशतवादी हल्ले झाले आहेत. या पार्श्वभूमीवर ही चर्चा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
तुर्कस्तानच्या दौऱयावर नजर
पॅरिससह पॉम्पियो हे तुर्कस्तानातही जाणार आहेत. मागील काही काळापासून तुर्कस्तानमधील सरकारने कट्टरवादाचा मार्ग चोखाळला आहे. जॉर्जियामध्ये अमेरिकेचे विदेशमंत्री आर्थोडॉक्स चर्चच्या पदाधिकाऱयांचीही भेट घेणार आहेत. इस्रायल आणि आखाती देशांच्या दौऱयादरम्यान कूटनीतिक करारांवर विचारविनिमय होणार आहे. बहारीन, कतार आणि संयुक्त अरब अमिरातने इस्रायलशी राजनयिक करार केला आहे. सौदी अरेबियाही लवकरच करार करू शकतो.









