अहमदाबाद पोलिसांची कारवाई
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना आजार झाल्याची अफवा पसरल्याने अनेक चर्चांना उत आला होता. तथापि आपण पूर्णपणे तंदुरुस्त आहे. काहींना माझ्या मृत्युची प्रतीक्षा आहे, त्यांनी तशा इच्छाही व्यक्त केल्या आहेत. तथापि यामुळे माझे आयुष्य आणखी वाढले आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री शहा यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.
दरम्यान, याप्रकरणी अहमदाबाद पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. गृहमंत्री शहा यांनी याप्रकरणी ट्विट करताना देश आणि जग सध्या कोरोनासारख्या महामारीशी लढा देत आहे. देशाचा गृहमंत्री म्हणून कार्य करत असताना सध्या त्यातून मार्ग काढण्याचेच प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे हितशत्रू नेमके काय म्हणत आहेत, याकडे आपण लक्ष देत नाही आणि त्याबाबत स्पष्टीकरणही देण्याची गरज नाही. आपली प्रकृती उत्तम असून काही लोकांना माझ्या मृत्युची प्रतीक्षा आहे. परंतु भाजपचे असंख्य कार्यकर्ते आणि आमच्या कार्यवर समाधान व्यक्त करणाऱया जनतेचे आशीर्वाद असल्याने आपण कसलीही काळजी करत नसल्याचे त्यांनी ट्विट केले आहे.
हिंदु धर्माच्या मान्यतेनुसार अशा अफवा ज्या व्यक्तींबाबत उठवल्या जातात त्यांची प्रकृती आणि आयुष्यमान आणखीनच चांगले होत असते, आणि अशा व्यर्थ बाबींवर चर्चा करण्यापेक्षा आपण आपल्या कामावर अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. माझ्या प्रकृतीची काळजी करणाऱयांचा मी ऋणी आहे. आणि जे अफवा परवत आहेत, त्यांच्याबद्दल माझी कोणतीही तक्रार नाही, असेही अमित शहा यांनी म्हटले आहे.
दरम्यान, शहा यांच्या प्रकृतीविषयी एप्रिल महिन्यामध्ये समाज माध्यमांवरुन विविध अफवा उठल्या होता. त्या संदर्भात सरकारच्या पत्र सूचना विभागानेच खुलासा केला होता. एका हिंदी वृत्त वाहिनीच्या नावाने छेडछाड आणि बदल केलेला गृहमंत्री अमित शहा यांचा फोटो सध्या समाज माध्यमांवर प्रसारित केला जात आहे. या फोटोमध्ये शहा यांना कोरोनाची लागण झाल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र फोटो खोटा असून गोंधळ निर्माण करण्याच्या हेतुने प्रसारित केला जात आहे, कृपया हा फोटो शेअर अथवा फारवर्ड करु नये, असे आवाहन पीआयबीने केले होते.









