ऑनलाईन टीम / मुंबई :
देशात कोरो नाचा प्रादुर्भाव वेगाने पसरत आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेने तर प्रत्येकाच्या घरात शिरकाव केला आहे. त्यातच आता बॉलिवूडचा भाईजान सलमान खान याच्या घरातही कोरोनाने शिरकाव केला आहे. सलमान खानच्या बहिणी अर्पिता खान आणि अलविरा खान दोघीही करोना पॉझिटिव्ह आहे. याची माहिती स्वतः सलमान खान याने दिली आहे.
सलमान खान लवकरच ‘राधे: युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कोरोना व्हायरसमुळे हा चित्रपट भारतात फक्त ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज केला जाणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी सलमानने नुकतीच एक प्रेस कॉन्फरन्स ठेवली होती. यावेळी बोलताना सलमान खानने त्याच्या बहिणी अर्पिता खान आणि अलविरा खान कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे सांगितले.
सलमान खान म्हणाला, माझ्या दोन्ही बहिणींना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र, त्यांच्यात सध्या कोरोनाची कोणतीही लक्षण दिसत नाही आहेत. पुढे तो म्हणाला, मागच्या वर्षी जेव्हा कोरोना संक्रमितांची संख्या समोर येत होती त्यावेळी कोणाला कोरोना झाल्याचे ऐकू येत होते. मागच्या वर्षी माझ्या दोन ड्रायव्हर्सना कोरोनाची लागण झाली होती. पण आता तर तो घरात घुसला आहे. माझ्या जवळची माणसंही आता कोरोनाग्रस्त आहेत. कोरोनाची ही दुसरी लाट खूपच घातक आहे.
दरम्यान, सलमानची बहीण अर्पिता खान हिने 2014 साली अभिनेता आयुष शर्माशी लग्न केले होते. तर दुसरी बहीण अलविराचे लग्न अभिनेता आणि निर्मिता अतुल अग्निहोत्रीशी झाले आहे.