दोघा जणांना अटक : 1 लाख 55 हजारचा मुद्देमाल जप्त
प्रतिनिधी/ बेळगाव
बेकायदेशीररीत्या अवैध दारू वाहतूक करताना मुचंडी बसस्थानकानजीक दोघा जणांना अटक केली आहे. सोमवारी रात्री ही घटना घडली असून अबकारी विभागाने या संबंधी दोघा जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 1 लाख 55 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
महेश शंकर हाजगोळकर (वय 20, रा. ज्योतीनगर), सुरेश दासाप्पा नायक (वय 31, रा. बुड्रय़ानूर) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. अबकारी खात्याचे साहाय्यक आयुक्त मंजुनाथ, उपायुक्त जयराम गौडा यांच्या मार्गदर्शनाखाली अबकारी निरीक्षक लिंगराज के., किरण ठक्कण्णावर, मल्लप्पा ठक्कण्णावर आदींनी ही कारवाई केली आहे.
सोमवारी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास मुचंडी येथील बसथांबजवळ बेकायदेशीररीत्या दारू वाहतूक करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. महेश व सुरेश हे दोघे ऑटोरिक्षा क्रमांक केए 22 सी 8977 या वाहनातून टय़ुबमधून 50 लीटर दारू वाहतूक करत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी धाड टाकून त्यांना अटक केली. त्यांच्याकडील रिक्षा व दारू असा एकूण 1 लाख 55 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.









