वृत्त संस्था/ अबु धाबी
आयसीसी टी-20 विश्वचषक पुरूषांच्या क्रिकेट स्पर्धेत येथे रविवारी अफगाण आणि या स्पर्धेत प्रथमच पदार्पण करणाऱया नामिबिया यांच्यात सामना होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता लढतीला प्रारंभ होईल. अफगाण संघ पुन्हा विजय मिळविण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे.
या स्पर्धेमध्ये अफगाण संघाने आपला दर्जा सिद्ध केला आहे. या संघाकडे जागतिक दर्जाचे फिरकी गोलंदाज उपलब्ध असल्याने कोणत्याही प्रतिस्पर्धी संघाला सावध रहावे लागेल. अफगाण संघातील रशीद खान हा अव्वल फिरकी गोलंदाज असून या संघामध्ये मुजीब उर रेहमान आणि कर्णधार मोहम्मद नबी यांची गोलंदाजी प्रतिस्पर्धी संघाला दमवत असल्याचे दिसून येते. या स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यामध्ये अफगाणच्या फिरकी गोलंदाजी कामगिरी चांगली झाली आहे.
पहिल्या सामन्यात अफगाणने स्कॉटलंडचा पराभव केला. त्यानंतर शुक्रवारी रात्री झालेल्या सामन्यात पाक संघालाही विजयासाठी शेवटच्या षटकांपर्यंत झगडावे लागले. बलाढय़ पाकिस्तानविरूद्ध सुरूवातीला पाकने ठराविक अंतराने गडी गमविले. पण त्यानंतर नबी-गुलबदिन नाईब या जोडीने शेवटच्या 45 चेंडूत 71 धावांची भागीदारी केली. त्या सामन्यात अफगाणने आणखी 20 धावांची भर घातली असती पाक संघाला विजयासाठी कसरत करावी लागली असती. अंतिमतः पाकने हा सामना 5 गडय़ांनी जिंकला होता. अफगाणने आतापर्यंत दोन सामने खेळले असून त्यापैकी एक सामना जिंकला तर दुसऱया सामन्यात हार पत्करावी लागली.
टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पदार्पण करणाऱया नामिबिया संघाला पात्र फेरीच्या स्पर्धेत हॉलंड आणि आयर्लंड संघाकडून पराभव पत्करावे लागले. पण, त्यानंतर पहिल्या सामन्यात स्कॉटलंडवर विजय मिळवून आता ते अफगाणशी लढत देण्यास सज्ज झाले आहेत. स्कॉटलंडविरुद्ध नामिबियाची गोलंदाजी भेदक झाली. त्यानी स्कॉटलंडला 109 धावावर रोखले. त्यानंतर नामिबियाने सावध फलंदाजी करत विजय मिळविला. रविवारच्या सामन्यात नामिबियाला फलंदाजी आणि गोलंदाजीतही सुधारणा करावी लागेल. नामिबियाचे नेतृत्व इरासमुसकडे आहे.









