तपास यंत्रणांचा दावा ः 101 जणांचा गेला होता बळी
वृत्तसंस्था / पेशावर
पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वामध्ये मशिदीमध्ये झालेल्या आत्मघाती स्फोटाचा कट अफगाणिस्तानात रचला गेला होता. अफगणिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेने याकरता निधी पुरविली होता असा दावा पाकिस्तानच्या तपास यंत्रणांनी केला आहे.
या स्फोटात वापरण्यात आलेली दुचाकी पेशावरमधील बाजार ‘सरकी गेट’मध्ये दोनवेळा विकण्यात आली होती. दुचाकीची विक्री करणाऱयांना अटक करण्यात आली असल्याचे पाकिस्तानच्या तपास अधिकाऱयांनी सांगितले आहे. या हल्ल्यात सामील 17 संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. याचरम्यान दहशतवाद विरोधी विभागाने आत्मघाती हल्लेखोराला मदत करणाऱयांबद्दल माहिती दिल्यास 1 कोटी रुपयांचे इनाम देणार असल्याचे घोषित केले आहे.
डीएनए नमुन्यांद्वारे आत्मघाती हल्लेखोराची ओळख पटविण्यात आली आहे. हल्लेखोराने मशिदीत शिरण्यापूर्वी स्वतःचे हेल्मेट बाहेरच ठेवले होते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे कृत्य दिसून आले हेते. आत्मघाती स्फोट घडवून आणण्यासाठी मदत केलेल्यांना लवकरच अटक केली जाईल. आत्मघाती दहशतवादी पोलिसाच्या गणवेशात मशिदीत शिरला होता, तसेच तो दुचाकीने तेथे पोहोचला होता अशी माहिती खैबर पख्तूनख्वा प्रांताचे पोलीस प्रमुख मोआज्जिम जेह अंसारी यांनी दिली आहे.
तालिबानच्या आत्मघाती दहशतवाद्याने 30 जानेवारी रोजी पेशावर येथील मशिदीत स्फोट घडवून आणला होता. त्यावेळी मशिदीत मोठय़ा संख्येत लोक सामूहिक प्रार्थना करत होते. या स्फोटात 101 लोकांचा मृत्यू झाला होता तर 200 हून अधिक जण जखमी झाले हेते. मृतांमध्ये मोठय़ा संख्येत पोलिसांचा समावेश होता. पाकिस्तान-तालिबानने या स्फोटाची जबाबदारी स्वीकारली होती.
पाकिस्तान तालिबानला तहरीक-ए-तालिबान या नावानेही ओळखले जाते. मागील वर्षी ऑगस्टमध्ये टीटीपीचा नेता उमर खालिद खुरासनी याच्या हत्येचा सूड या स्फोटाद्वारे उगविल्याचे दहशतवादी संघटनेने म्हटले होते. टीटीपीने जाहीरपणे दावा करत एकप्रकारे पाकिस्तानच्या सरकारला उघड आव्हान दिले आहे. उमर खालिद खुरासनीचा मृत्यू ऑगस्ट 2022 मध्ये अफगाणिस्तानात झाला होता. त्याच्या कारला लक्ष्य करत एक स्फोट घडवून आणला गेला होता, यात खुरासनीसमवेत 3 जण मारले गेले होते.









