प्रतिनिधी/ सातारा
पोवईनाका येथील कुबेर विनायक मंदिराजवळ असणाऱया लाटकर पेढेवाले यांच्या दुकानासमोरून दुचाकीवरून निघालेल्या एका खासगी कंपनीचा कर्मचारी अरूण धनराज गुजले (वय 24, रा. वेळे कामथी ता. सातारा) याला दुचाकी येणाऱया दोन अज्ञातांनी कट का मारला यांची विचारणा करत मारहाण केली. या मारहाणीवेळी त्यांच्याजवळील दुचाकीच्या डिकीत असणारे 1 लाख 56 हजार रूपये लुटले. अवघ्या काही मिनिटांमध्ये घडलेल्या थरारक घटनेने परिसर हादरुन गेला असून भर दिवसा घडलेल्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरुण धनराज गुजले हे एका खासगी कंपनीत काम करत आहे. शुक्रवारी सकाळी 11.15 च्या सुमारास ते बँकेत पैसे भरण्यासाठी दुचाकीवरुन निघाले होते. दुचाकी पोवई नाक्यावर आल्यानंतर लाटकर पेढेवाले दुकानासमोर त्यांना दोन अज्ञात युवकांनी अडवले. आमच्या दुचाकीला कट का मारला, असे म्हणत यांच्यात वाद झाला. या वादात एकाने धनराज यांच्या गाडीची डिकी उघडून त्यात ठेवलेले 1 लाख 56 हजार एवढी रोख रक्कम ताब्यात घेऊन तेथून पलायन केले. ही बाब धनराज यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांने आरडाओरडा केला. परंतु संशयित तेथून पसार झाले. स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचले. यावेळी बघ्यांनी मोठय़ा प्रमाणावर गर्दी केली होती. मारहाणीमध्ये मुक्कामार लागलेल्या अरुण गुजले याच्यावर सातारा येथील जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. सातारमध्ये भरदिवसा लुटमार करुन रोकड नेल्याने परिसर हादरुन गेला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. त्यानुसार पोलीस संशयिताचा तपास करत आहेत.








