वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांचे आवाहन पर्वरीत 12 लाभार्थींना धनादेश प्रदान
विशेष प्रतिनिधी/ पर्वरी
रस्ता अपघातात बळी गेलेल्यांच्या कुटुबियांसाठी वाहतूक खात्यातर्फे सुरु करण्यात आलेल्या आर्थिक सहाय योजनेच्या लाभार्थींना काल गुरुवारी वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांच्या हस्ते धनादेश देण्यात आले. वाहन चालवताना अपघात होऊन बळी गेलेल्याच्या कुटुंबियांना 2 लाख रुपये वाहतूक खाते देते. लोकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन वाहतूकमंत्र्यांनी केले. पर्वरी येथे सचिवालयातील सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.
एकूण 22 जणांना या योजनेंतर्गत आर्थिक सहाय मंजूर झाले असून गुरुवारी त्यापैकी 12 जणांना धनादेश देण्यात आले. अपघातात बळी गेलेल्यांसाठी 2 लाख रुपये, अवयव गमावलेल्यांना 1.5 ते 1 लाख रुपये तर 3 ते 7 दिवस रुग्णालयात उपचार घेणाऱयाला 10 हजार रुपयांचा लाभ या योजनेंतर्गत मिळतो. अपघात झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत या योजनेसाठी अर्ज करणे आवश्यक आहे.
जनतेला सर्व योजना वेळेवर मिळणार
कोरोनामुळे सरकारच्या तिजोरीला मोठा फटका बसला आहे. पर्यटन व्यवसाय ठप्प झाला आहे. आर्थिक उत्पन्न कमी झाली आहे. तरीही सरकार सर्व योजना वेळेवर पूर्ण करत आहे, असेही ते म्हणाले.
वाहतूक कायद्यात शिथिलता आणणार
केंद सरकारने वाहतूक कायद्यात कडक नियम केले आहेत. त्यांचे पालन सर्व राज्यांना करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. गोवा हे इतर राज्याच्या तुलनेत लहान असल्याने गोव्यासाठी या कायद्यात शिथिलता देण्याची मागणी गोवा करणार आहे. वाहतूक दंडाची रक्कम कमी करण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असेही ते म्हणाले.
कोरोना काळामुळे पंचायतीमध्ये 50 पेक्षा जास्त लोकांना घेऊन ग्रामसभा भरविता येत नाही, पण अनेक ठिकाणी याचे पालन करताना दिसत नाही, काही पंचायतीमध्ये ग्रामसभा भरविल्या जात आहेत. लोक कोरोनाच्या नियमांचे पालन करत नाहीत, असे मंत्री गुदिन्हो यांनी सांगितले.









