1000 हून अधिक श्वानांचे वास्तव्यस्थान
अमेझॉन प्राइमची वेबसीरिज ‘पाताल लोक’मध्ये एक डायलॉग आहे, “कुत्ते से सच्चा प्रेम करने वाले हमेशा मन के साफ होते है…अगर आदमी कुत्ते को पसंद करते मतलब वो अच्छा आदमी है, अगर कुत्ता आदमी को पसंद करे तो मतलब वो वाकई सच्चा आदमी है’’. थायलंडमधील एका व्यक्तीने 1 हजारांहून अधिक श्वानांचा जीव वाचविला असून स्वतःच्या शेल्टर होममध्ये आसरा दिला आहे. यातील अनेक श्वान अपंग आहेत, परंतु या व्यक्तीच्या मदतीने चालू शकत आहेत.

थायलंडच्या चॉनबुरीमध्ये ‘द मॅन दॅट रेस्क्यू डॉ’ नावाचे शेल्टर असून ते भटक्या श्वानांसाठी राहण्याकरता घर देते. या ऍनिमल शेल्टर होमची सुरुवात स्वीडनचे रहिवासी मायकल जे बेन्स यांनी केली आहे. 2002 मध्ये स्वतःच्या देशामधून थायलंडमध्ये एक रेस्टॉरंट सुरू करण्यासाठी ते पोहोचले होते. थायलंडच्या शहरांमध्ये रस्त्यांवर श्वान फिरत असून ते खाली पडलेल्या गोष्टींवर जगत असल्याचे त्यांना दिसून आले. 2011 मध्ये त्यांना एका भटक्या श्वानाबद्दल आपुलकी निर्माण झाली. हा श्वान दररोज त्यांच्या रेस्टॉरंटसमोर अन्नासाठी येत होता.
2017 पासून शेल्टर होम
त्या श्वानासह शहरातील आणखीन अनेक श्वानांची देखभाल करत त्यांना राहण्यासाठी घर देण्याचा निर्णय मायकल यांनी घेतला. 2017 पर्यंत ते सुमारे 100 श्वानांना अन्न पुरवू लागले आणि तेव्हा त्यांनी स्वतःचे शेल्टर होम सुरू केले. यात काही लोकांची नियुक्ती केली आहे. या केंद्रात अपंग श्वान देखील राहतात. अशा श्वानांना हिंडता यावे म्हणून मायकल आणि त्यांचे सहकारी एक टायरयुक्त गाडी जोडून देतात.
अपंग श्वानांना नवे जीवन
2019 मध्ये त्यांच्या टीमने 2 प्राण्यांच्या डॉक्टरांनाही नियुक्त केले आणि रस्ते दुर्घटनांमध्ये जखमी झालेल्या श्वानांसाठी मोहीम चालविली. या शेल्टर होममध्ये थायलंड तसेच अन्य देशांच्या लोकांकडूनही देणगी पाठविली जाते. सध्या तेथे 27 अपंग श्वान असून त्यांची उत्तमप्रकारे देखभाल केली जात आहे.









