सातारा / प्रतिनिधी :
साताऱ्यातील ग्रेड सेपरटेरटचे शुक्रवारी खासदार उदयनराजेंनी अचानक उद्घाटन केल्याने खळबळ उडाली. त्याच्या दुसऱ्याच्या दिवशी ग्रेड सेपरटेरच्या भुयारी मार्गाच्या बोर्डवर झालेले तणावाचे वातावरण साताऱ्यात असतानाच दुपारी अचानकपणे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे दोघे कराडला जाता-जाता साताऱ्यात शासकीय विश्रामगृहावर आले. त्यांचे स्वागत सातारा पोलीस दलाने केले. बांधकाम विभागाच्या अभियंत्यांकडून इतर कामांचा आढावा घेत पुन्हा पुढच्या मार्गाला रवाना झाले. मात्र, त्यांनी ग्रेड सेपरेटरच्या नावाचा चकार शब्दही काढला नसल्याचे समजते.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा आणि साताऱ्याचे खासदार उदयनराजे यांचे जुने राजकीय वैर आहे. राष्ट्रवादी पक्षात खासदार उदयनराजे हे होते तेव्हाही दोघांचे पटले नव्हते. आता तर अजितदादांनी त्यांचे बंधू आमदार शिवेंद्रराजे यांना आणखी जवळ करत सातारा शहरासाठी बरच काही देण्याबाबत हालचाली सुरु केल्या आहेत. असे असताना अचानकपणे पूर्ण झालेल्या ग्रेड सेपरेटरचे उद्घाटन खासदार उदयनराजेंनी करत धक्का दिला. तर दुसऱ्या दिवशी ग्रेड सेपरटेरच्या नावाचा बोर्ड फाडल्याने तणाव होता. अशा वातावरणातच कराड येथे स्व.विलासकाका यांच्या घरी त्यांच्या कुटुंबियांकडे सात्वंनासाठी निघालेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा व राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे महामार्गावरुन शासकीय विश्रामगृहाकडे वळले. त्याची अगोदर सातारा पोलीस दलाला व बांधकाम विभागास कल्पना होती. त्यांचे स्वागत सातारा पोलीस दलाच्यावतीने सह पोलीस अधीक्षक श्रीमती ऑचल, पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांनी केले.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी त्यांचे स्वागत करुन दहा मिनिटे बांधकाम विभागाच्या अभियंत्यांशी त्यांनी विकास कामाचा आढावा घेतला. त्यात सर्कीट हाऊसच्या कामाचे कुठपर्यंत आले आहे, याची माहिती घेतली. परंतु, त्यांनी ग्रेड सेपरटेरच्या उद्घाटनाबाबत चकार शब्दही न काढता ते पुढच्या मार्गाला रवाना झाले.









