निर्बंध उठवण्यासाठी भाजप खासदार, आमदारांचा इशारा : अधिकारी निष्क्रिय : बदल्यांची मागणी : रस्त्यावर उतरणार
प्रतिनिधी / सांगली
गेल्या तीन-सव्वा तीन महिन्यांपासून जिह्यात लॉकडाऊन आहे. आता तर निर्बंध कडक केले आहेत. तरीही केरोना रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाही. छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. आता सगळे सहनशक्तीच्या पलिकेडे गेले आहे. येत्या दोन दिवसात प्रशासनाने निर्बंध उठवावेत, अन्यथा शुक्रवारी दुकाने सुरु करु, रस्त्यावर उतरु, असा इशारा भाजपच्यावतीने देण्यात आला आहे. भाजपचे खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे यांनी याविषयावर संयुक्त पत्रकार परिषद घेत बाजू मांडली.
दरम्यान, जिह्यातील कोरोना नियंत्रणात अधिकारी अपयशी ठरलेल्या निष्क्रिय अधिकाऱयांची तत्काळ बदली करावी, अशी मागणीही केली. खासदार पाटील म्हणाले, लॉकडाऊनमुळे व्यावसायिक, दुकानदारांसह सर्वसामान्यांची अवस्था बिकट झाली आहे. तीन महिन्याहून अधिक काळ लॉकडाऊन व्यावसायिकांच्या मानगुटीवर आहे. त्यांना वेठीस धरले जात आहे. आता सहन करण्याची क्षमता संपली आहे. प्रशासनाने अंत न पाहता दोन दिवसांत निर्बंध उठवावेत. अन्यथा शुक्रवारी सर्व दुकाने सुरु करण्यात येतील. काही तालुक्यांमध्ये रुग्णसंख्या वाढत आहे. त्याची शिक्षा अन्य तालुक्यांना कशासाठी? असा करुन ते म्हणाले, कृष्णा साखर कारखान्याच्या निवडणुकीमुळे वाळवा, कडेगाव तालुक्यांत कोरोना वाढला आहे.
कडक निर्बंधानंतरही कोरोना नियंत्रणात येत नाही. आजही रुग्णसंख्या हजारच्या आसपास आहे. मग, लॉकडाऊनमुळे काय साध्य झाले? पालकमंत्री जयंत पाटील यांच्याशीही चर्चा करु. पण, आता संयम सुटत आहे. व्यापारी, नागरिकांमध्ये असंतोष आहे. आमदार गाडगीळ म्हणाले, एकीकडे दुकाने बंद आहेत, तर दुसरीकडे कोणत्याही करामध्ये व्यापाऱयांना सवलत दिलेली नाही. प्रशासन सोईनुसार काम करत आहे. कोरोना नियंत्रणासाठी लॉकडाऊनच्या पर्यायाचा वापर करत आहे. यावेळी भाजप शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे-म्हैसाळकर, माजी उपमहापौर धीरज सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
निष्क्रिय अधिकाऱयांच्या बदल्या करा
तीन महिन्याच्या लॉकडाऊननंतरही रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यात अधिकाऱयांना अपयश आले आहे. अधिकारी निष्क्रिय आहेत. अशांची तत्काळ बदली करावी. अपेक्स प्रकरणात महापालिकेतील भाजप नगरसेवकांच्या पाठीशीही पूर्ण ताकदीने उभा आहे.
खासदार संजय पाटील








