आमदार नीतेश राणेंचा इशाराः
देवगडात नुकसानीची केली पाहणीः
नुकसानीच्या आकडेवारीनुसारच भरपाई द्याः
जादा रक्कमेचे पंचनामे झालेच पाहिजेत
वार्ताहर/ देवगड:
देवगड तालुक्यातील किनारी भागात तौक्ते चक्रीवादळाने केलेल्या नुकसानीची पाहणी आमदार नीतेश राणे यांनी गुरुवारी केली. मिठबाव, तांबळडेग, कातवण, कुणकेश्वर, तारामुंबरी, देवगड, जामसंडे- मळई या भागात प्रत्यक्ष घटनास्थळी जात नुकसानीची पाहणी केली. लोकांच्या नुकसानीच्या आकडेवारीनुसार भरपाई मिळाली नाही, तर मंत्र्यांना जिल्हय़ात फिरू देणार नाही. अधिकारी वर्गाने योग्यप्रकारे काम केले नाही. पंचनामे जादा रक्कमेचे केले नाहीत, तर त्यांना काम करू देणार नाही. जनतेला योग्य न्याय मिळाला पाहिजे, असा इशारा राणेंनी दिला.
यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बाळ खडपे, माजी आमदार ऍड. अजित गोगटे, तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, सभापती लक्ष्मण पाळेकर, उपसभापती रवींद्र तिर्लोटकर, जि. प. सदस्या सौ. सावी लोके, मिठबाव सरपंच भाई नरे, विभागीय अध्यक्ष शैलेश लोके, नगराध्यक्षा सौ. प्रियांका साळसकर, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर, नगरसेवक उमेश कणेरकर, प्रांताधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार मारुती कांबळे, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, मत्स्यव्यवसाय अधिकारी मालवणकर, देवगड नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गव्हाणे, तालुका कृषी अधिकारी व कृषी सहाय्यक, मंडल अधिकारी व तलाठी, ग्रामसेवक, वीज वितरण कंपनीचे उपअभियंता शेख आदी उपस्थित होते.
तौक्ते चक्रीवादळामुळे तालुक्यामध्ये प्रचंड नुकसान झाले आहे. आमदार राणे यांनी तांबळडेग येथे भेट देत गजबादेवी मंदिर परिसर व तेथील वस्तीतील नुकसानीची माहिती सरपंचांकडून जाणून घेतली. मिठबाव येथे सरपंच नरे यांनी, तर कुणकेश्वर येथे सरपंच गोविंद घाडी यांनी नुकसानीची माहिती दिली. तेथील आंबा बागायतदार शैलेश बोंडाळे यांच्या बागेतील हापूसच्या नुकसानीची पाहणी राणेंनी केली. कातवण ग्रामस्थांनीही आमदार राणेंची भेट घेत आंबा व नारळ बागायतींच्या नुकसानीची माहिती दिली. माजी सरपंच प्रकाश जोईल, बापू धुरी यांनी सविस्तर माहिती दिली.
कौले, पत्र्यांची नुकसान भरपाई स्वखर्चातून देणार
आमदार राणे यांनी मिठबाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत, अधिकारी व कर्मचारी निवासस्थानाच्या झालेल्या नुकसानीबाबत चिंता व्यक्त केली. तातडीने दुरुस्तीचे प्रयत्न करावेत, अशा सूचना त्यांनी सरपंच नरे यांना केल्या. इमारतीसाठी आवश्यक साहित्याचा आपण स्वतः पुरवठा करू. आपण काम करून घ्या, असे त्यांनी सांगितले. ज्या घरांची कौले व पत्र्यांचे नुकसान झाले आहे, त्यांना स्वखर्चाने पत्रे व कौलांचा पुरवठा करणार असल्याचे राणेंनी सांगितले.
मच्छीमारांना जास्त नुकसान भरपाई मिळवून देऊ!
देवगड- आनंदवाडी येथील दुर्घटनाग्रस्त नौका मालकांची भेट घेत राणेंनी घेतली. मच्छीमार नौकांचे सुमारे 40 लाखाचे नुकसान झाले आहे. शासनाच्या निकषाप्रमाणे त्यांना पाच लाखाची नुकसान भरपाई मिळाली, तर त्यांनी पुढील रक्कम आणायची कशी, असा प्रश्न राणेंनी उपस्थित केला. मच्छीमारांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई शासनाकडून मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे आश्वासन राणेंनी दिले.
उत्पन्नाच्या पटीत नुकसान भरपाई द्या!
वादळामुळे आंबा व नारळ बागांचे मोठे नुकसान झाले आहे. शासन निकषाप्रमाणे एका कलमाला केवळ पाचशे रुपये नुकसान भरपाई दिली जाणार आहे. मुळात एका वर्षात एक झाड 20 ते 25 हजार रुपयांचे उत्पन्न शेतकऱयाला देत असते. अशावेळी शेतकऱयाला त्या पटीनेचे नुकसान भरपाई दिली जावी. तशाप्रकारे पंचनामे अधिकारी वर्गाने करावेत. इमारती व घरांच्या नुकसानीचे पंचनामेही जादा रकमेचे झाले पाहिजेत. शासनाला जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्यासाठी भाग पाडणार असल्याचे राणेंनी सांगितले.
चांगल्या कामगिरीचे राणेंकडून कौतुक
आमदार राणे यांनी येथील कोविड सेंटरला भेट देत तालुका आरोग्य अधिकारी संतोष कोंडके, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक संदीप भगत व त्यांच्या कर्मचारी वर्गाचा चांगल्या कामगिरीबाबत सत्कार केला. तसेच नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी, वीज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचाऱयांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान, तारामुंबरी येथील स्मशानभूमी रस्त्याच्या नुकसानीची राणेंनी केली. तसेच तेथील घरांच्या झालेल्या पडझडीबाबत नुकसानग्रस्तांची भेट घेत त्यांना धीर दिला.
मुख्यमंत्र्यांचा दौरा ‘फोटोसेशन’साठी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सिंधुदुर्ग दौरा केवळ ‘फोटोसेशन’चा ठरणार आहे. त्यांच्या दौऱयात येथील जनतेला काहीही मिळणार नाही. मागील नुकसान भरपाई देण्यासाठी हे शासन असमर्थ ठरले आहे. हंगामी मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी नुकसानग्रस्तांना तातडीची मदत दिली होती. वादळ होऊन चार ते पाच दिवस उलटले, तरीही तातडीची मदत प्राप्त झाली नाही, अशी टीका राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर केली.









