वृत्तसंस्था/ चेन्नई
यजमान तामिळनाडू आणि मुंबई यांच्यातील चार दिवसांचा रणजी सामना मंगळवारी खेळाच्या शेवटच्या दिवशी अनिर्णित अवस्थेत संपला. या सामन्यात मुंबईने चेन्नईवर पहिल्या डावात 164 धावांची आघाडी घेतल्याने त्यांना या सामन्यात तीन गुण मिळाले.
रणजी स्पर्धेतील ब गटातील हा सामना अनिर्णित राखण्यात मुंबईने प्रयत्न केल्याने त्यांनी आपली या स्पर्धेतील पराभवाची मालिका खंडित केली आहे. मुंबईने यापूर्वी सलग दोन सामने गमविले होते. तामिळनाडूच्या विरूद्धच्या सामन्यात मुंबईने पहिल्या डावात 488 धावांचा डोंगर उभा केला. कर्णधार अदित्त्य तरेने 154, मुलानीने 87, अत्रादेने 58, जय बिस्तने 41 धावा जमविल्या. त्यानंतर तामिळनाडूचा पहिला डाव 156.4 षटकांत 324 धावांत आटोपला. कर्णधार अश्विनने 79, कौशिक गांधीने 60, अनुभव मुकूंदने 58 धावा जमविल्या. मुंबईतर्फे मुलानीने 72 धावांत 4 गडी बाद केले. तुषार देशपांडे आणि डायस यांनी प्रत्येकी दोन बळी मिळविले. तामिळनाडूला मुंबईकडून फॉलोऑन स्वीकारावा लागला. तामिळनाडूने दुसऱया डावात 1 बाद 48 धावा जमवित हा सामना अनिर्णित राखला. तामिळनाडूला 1 गुण मिळाला. रणजी स्पर्धेच्या गुणतक्त्यात मुंबईने चार सामन्यांतून 9 गुण तर तामिळनाडूने पाच सामन्यांतून 2 गुण घेतले आहेत.
संक्षिप्त धावफलक
मुंबई प. डाव सर्वबाद 488, तामिळनाडू प. डाव सर्वबाद 324, तामिळनाडू दु. डाव 22 षटकांत 1 बाद 48.
सौराष्ट्र प. डाव 7 बाद 581, कर्नाटक प. डाव- 171, कर्नाटक दु. डाव 4 बाद 220, सौराष्ट्र तीन गुण, कर्नाटक 1 गुण.
उत्तरप्रदेश प.डाव- 431, बडोदा प.डाव 230, बडोदा दु. डाव 1 बाद 113, उत्तरप्रदेश तीन गुण, बडोदा एक गुण.
मध्यप्रदेश प. डाव- सर्वबाद 124, रेल्वे प. डाव- 244, मध्यप्रदेश दु. डाव 9 बाद 330, रेल्वे दु. डाव- 5 बाद 205, रेल्वे तीन गुण, मध्यप्रदेश एक गुण.









