सर्वसामान्य जनतेची कामेही रेंगाळणार : वाहतुकीची होणार कोंडी, विकासकामांवर परिणाम
प्रतिनिधी /बेळगाव
यावषीही बेळगावात हिवाळी अधिवेशन घेण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू झाले आहेत. मात्र अधिवेशनामुळे अधिकारी त्या कामामध्येच गुंतणार आहेत. त्यामुळे इतर कामांवर त्याचा परिणाम होणार असून सर्वसामान्य जनतेला त्याचा मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. याचबरोबर अधिकाऱयांचीही चांगलीच तारांबळ उडणार आहे. सरकारी अधिकाऱयांबरोबरच पोलिसांवरही या अधिवेशनाच ताण वाढणार आहे. एकूणच बेळगावमधील अधिवेशन हे सर्वसामान्य जनतेबरोबरच अधिकाऱयांची डोकेदुखी ठरणारे आहे. तेव्हा बेळगावात अधिवेशन नकोच म्हणण्याची वेळ अधिकाऱयांवर व जनतेवर येऊन ठेपली आहे.
हिवाळी अधिवेशन घेण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे त्या अधिवेशनाच्या तयारीत अधिकारी गुंतले आहेत. यामुळे सर्वच कार्यालयांमध्ये शुकशुकाट पसरणार आहे. येणाऱया मंत्रिमहोदय आणि अधिकाऱयांची बडदास्त कशा प्रकारे ठेवायची याच विचारात सध्या अधिकारी गुंतले आहेत. आपल्या नेहमीच्या कामाकडे मात्र दुर्लक्ष होण्याची शक्मयता आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेची कामे रेंगाळणार आहेत. कामासाठी आलेल्या जनतेला अधिकारी नसल्यामुळे रिकाम्या हाती घरी परतावे लागणार आहे. एकूणच अधिवेशनामुळे त्याचा परिणाम जनतेच्या कामावर होण्याची शक्मयता आहे.
हिवाळी अधिवेशन घेण्याबाबत अधिकाऱयांना सूचना दिल्या गेल्या आहेत. डिसेंबरमध्ये हे अधिवेशन होणार आहे. त्यामुळे बेंगळूरमधून मोठा फौजफाटा बेळगावात दाखल होणार आहे. मंत्रिमहोदयांची बडदास्त राखण्यासाठी बेळगाव येथील साऱयाच अधिकाऱयांना कामाला जुंपण्यात येणार आहे. त्यामुळे अधिकाऱयांची तारांबळ उडणार यात शंका नाही. अधिकाऱयांना मात्र आतापासूनच यासाठी जुंपण्यात आले आहे. त्यामुळे कार्यालयातील कामे खोळंबत असल्याचे चित्र आतापासूनच दिसून येत आहे.
अधिवेशन सुरू होण्याआधी आणि संपल्यानंतरही अनेक कार्यालयांतील अधिकाऱयांना तारेवरची कसरत करावी लागते. महत्त्वाचे म्हणजे अधिकारी येण्याआधीपासूनच हॉटेल व गेस्ट हाऊसची व्यवस्था करण्यासाठी अधिकाऱयांची धडपड सुरू झाली आहे. त्यामुळे विविध भागातून येणाऱया नागरिकांची मोठी गैरसोय होताना दिसून येत आहे. बेंगळूर येथून येणाऱया अधिकारी व नेते मंडळींची सोय करण्यासाठी अनेक अधिकारी धावाधाव करतानाचे चित्र दिसत आहे. असे असतानाही सरकार मात्र अधिवेशनाच्या नावाखाली कोणता विकास साधते? याचेच मोठे आश्चर्य नागरिकांना वाटू लागले आहे. आजपर्यंत जी अधिवेशने झाली आहेत त्यामधून काहीच निष्पन्न झाले नाही. त्यामुळे बेळगावात अधिवेशनच नको, असे या परिसरातील नागरिक म्हणत आहेत.
कर्नाटक विधानसभेचे हिवाळी अधिवेशन डिसेंबरपासून बेळगावात होण्याची शक्मयता आहे. याची तयारी प्रशासनाकडून जोरदारपणे सुरू केली आहे. अधिवेशनाच्या काळात राज्यभरातून मोठय़ा प्रमाणात पोलीस फौजफाटा बेळगावात दाखल होणार आहे. त्यामुळेच स्थानिक अधिकाऱयांना या कामी जुंपण्यात आल्याचेच दिसून येत आहे. येत्या काळात अधिवेशनासाठी आता सारे शहरच वेठीस ठेवण्याचा प्रकार यापूर्वी घडले आहेत. यावषीही असाच प्रकार होणार यात शंका नाही. अधिवेशनामुळे विविध संघटनादेखील बेळगावात दाखल होतात. त्यामुळे त्याचा परिणाम वाहतुकीवर होत आहे.
हॉटेल्समधील 80 टक्के रुम राखीव ठेवण्याचे आदेश
अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सर्व अधिकारी व मंत्री महोदयांची सोय केली जाते. मागील अधिवेशनावेळी धारवाड व हुबळी येथेही काही अधिकाऱयांची व मंत्र्यांची सोय करण्यात आली होती. महत्त्वाचे म्हणजे अधिकाऱयांसाठी हॉटेल्स चालकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न दरवषी होत असतो. अधिवेशन काळात एकही खोली कोणत्याही व्यक्तींना किंवा इतर समारंभासाठी भाडय़ाने देऊ नये, अशी सूचना त्यांना दिली जाते. यावषी आताच 80 टक्के प्रत्येक हॉटेल्समधील रुम राखीव ठेवण्याचे आदेश दिले आहेत. केवळ 20 टक्के रुम इतरांसाठी द्याव्यात, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी आदेश दिले आहेत.
बेळगावकरांची डोकेदुखी वाढणार
बेळगाव हे गोवा, महाराष्ट्र या सीमेवर वसलेले आहे. त्यामुळे गोवा व इतर राज्यातून मोठय़ा प्रमाणात बेळगावात पर्यटक येत असतात. बेळगावमधूनच इतर ठिकाणी पर्यटक जात असतात. मात्र त्यांना आता अधिवेशन झाल्यास काही मोजक्मयाच खोल्या शिल्लक राहणार आहेत. त्यामुळे हॉटेल चालकदेखील अडचणीत येणार आहेत. यामुळे या अधिवेशन काळात इतर व्यावसायिकांनाही त्याचा फटका बसणार आहे. एकूणच अधिवेशन म्हणजे बेळगावकरांची डोकेदुखी ठरणार आहे. यापूर्वी ही डोकेदुखी झाली होती. आता यावषीही अधिवेशन झाल्यास साऱयांनाच त्रास सहन करावा लागणार आहे.









