मध्यवर्ती म. ए. समितीच्या बैठकीत निर्धार
प्रतिनिधी/ बेळगाव
कर्नाटक सरकार मराठी भाषिकांना डिवचण्यासाठी बेळगावमध्ये अधिवेशन भरविते. याचा निषेध म्हणून म. ए. समितीच्यावतीने भव्य महामोर्चाचे आयोजन केले जाते. अधिवेशन काळात तोडीस तोड असा महामेळावा भरवून त्यामध्ये महाराष्ट्रात जाण्याची इच्छा व्यक्त केली जाते. यावषीदेखील अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भव्य महामेळावा होणार असून, यासाठी प्रत्येक विभागवार जागृती सभा घेतल्या जाणार असल्याचा निर्धार मध्यवर्ती म. ए. समितीच्या बैठकीत करण्यात आला.
मध्यवर्ती म. ए. समितीची महत्त्वपूर्ण बैठक शनिवारी मराठा मंदिर येथे पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मध्यवर्तीचे अध्यक्ष दीपक दळवी होते. अधिवेशन केव्हा सुरू होणार, याबाबत अद्याप घोषणा झालेली नाही. परंतु जेव्हा होईल त्यावेळी पहिल्या दिवशी भव्य महामेळावा घेतला जाईल. परवानगी मिळो अथवा न मिळो, व्हॅक्सिन डेपो शेजारील रस्त्यावर दुपारी 12 ते 4 यावेळेत महामेळावा होणारच, असा विश्वास अध्यक्ष दीपक दळवी यांनी व्यक्त केला.
शेतकऱयांना एकरी 50 हजार भरपाई द्या
अवकाळी पावसामुळे बेळगाव, खानापूर परिसरातील शेतकऱयांचे मोठे नुकसान झाले आहे. पीक कापणीला आले असतानाच पाऊस सुरू झाल्याने शेतकरी देशोधडीला लागला आहे. सरकारकडून तुटपुंजी नुकसानभरपाई जाहीर करण्यात आली आहे. परंतु ही नुकसानभरपाई अत्यंत कमी असून, त्यांना एकरी 50 हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी. ती न दिल्यास अधिवेशन संपल्यानंतर मध्यवर्ती म. ए. समितीच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा काढू, असा इशारा माजी आमदार मनोहर किणेकर यांनी दिला.
महाराजांविषयी वल्गना करणाऱयांचा निषेध
कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपप्रचार केला जात आहे. सर्व जाती-धर्माला घेऊन जाणाऱया छत्रपतींची तुलना इतरांशी करून वल्गना करण्याचे प्रकार घडत आहेत. शालेय पाठय़पुस्तक असो वा ग्रंथ यामधून शिवाजी महाराजांविषयी चुकीचे उल्लेख व बदनामीकारक लिखाण वारंवार होत आहे. त्यामुळे या कृतीचा मराठा समाजाच्यावतीने व मध्यवर्ती म. ए. समितीच्यावतीने निषेध करण्यात आला. सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी घटक समित्यांचे सदस्य उपस्थित होते.









