सलून व्यावसायिक संघटनेतर्फे आवाहन
प्रतिनिधी / बेळगाव
शहरातील लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आले असले तरी जोवर जिल्हाप्रशासनाकडून अधिकृत आदेश येत नाही तोवर सलून उघडू नयेत. जे व्यावसायिक दुकाने उघडत आहेत त्यांना 5 ते 12 हजारांपर्यंत दंड आकारण्यात येत आहे. त्यामुळे दुकाने उघडण्याची घाई करू नये, असे आवाहन बेळगाव सलून व्यावसायिक संघटनेतर्फे करण्यात आले आहे.
बेळगावचा समावेश ऑरेंज झोनमध्ये झाल्यामुळे सलून सुरू करावीत की नाही? याबाबत माहिती प्रशासनाकडून उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे जोवर प्रशासनाकडून आदेश येत नाही तोवर दुकाने उघडू नयेत. तसेच परवानगी मिळाली तरी दुकानदारांनी अटी व नियमांचे पालन करून दुकाने सुरू करावीत, असे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे.









