जिल्हाधिकाऱयांनी ग्वाही दिल्याची आमदार नीतेश राणे यांची माहिती
कणकवलीतील मंगळवारची गर्दी रोखण्याबाबत आढावा
शहरी भागातील प्रत्येकाची प्राधान्याने कोरोना रॅपीड टेस्ट करा!
वार्ताहर / कणकवली:
लॉकडाऊनमध्ये विकासकामे व बांधकामे सुरू करण्यासाठी सशर्थ परवानगी देण्यात आली आहे. मात्र, या कामांसाठी जे साहित्य आवश्यक आहे, ती दुकाने रोटेशन पद्धतीने सुरू करण्याबाबत दोन दिवसांत लेखी आदेश काढण्यात येणार असल्याची ग्वाही जिल्हाधिकाऱयांनी दिली, अशी माहिती आमदार नीतेश राणे यांनी दिली. कणकवलीचा मंगळवारचा आठवडा बाजार रद्द असतानाही मंगळवारी होणारी गर्दी रोखण्यासाठी पोलिसांनी कठोर उपाययोजना करावी, या संदर्भात कारवाई करताना जर कुठल्या लोकप्रतिनिधींचा दबावासाठी फोन आला, तर ती नावांची यादी माझ्याकडे द्या, अशा सूचना आमदार नीतेश राणे यांनी पोलिसांना दिल्या.
नगरपंचायतीमध्ये आढावा बैठकीत राणे बोलत होते. उपनगराध्यक्ष रवींद्र गायकवाड, गटनेते संजय कामतेकर, नगरसेवक बंडू हर्णे, मेघा गांगण, ऍड. विराज भोसले, अभिजीत मुसळे, शिशीर परुळेकर, प्रतीक्षा सावंत, ध्वजा उचले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विनायक चव्हाण, हवालदार अभिजीत तावडे आदी उपस्थित होते. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत ही आढावा बैठक घेण्यात आली.
न. पं.चे कर्मचारी मंगळवारी कार्यरत ठेवा!
आठवडा बाजाराच्या पार्श्वभूमीवर राणे यांनी आढावा घेत असताना व्यापारी संघाने काय उपाययोजना केल्या, त्याची माहिती घेतली. जिल्हाधिकाऱयांकडून लॉकडाऊन शिथीलतेबाबत स्पष्ट आदेश नसल्याचा मुद्दा कामत यांनी मांडला. अत्यावश्यक कामासाठी फिरताना अनेकदा विनाकारण फिरणाऱयांचीही संख्या वाढत असल्याने त्यांच्यावर निर्बंध आणण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर राणे यांनी न. पं.ने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जी यंत्रणा कार्यान्वीत केली आहे, ती अलर्ट ठेवा, मंगळवारची दुकाने बंद ठेवण्याच्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी न. पं. कर्मचारी शहरात कार्यरत ठेवण्याच्या सूचना राणे यांनी दिल्या.
शहरात पाच फिक्स पॉईंट!
त्यांनी पोलिसांकडून सुरू असलेल्या अंमलबजावणीची माहिती घेतली. शहरात पाच फिक्स पॉईंट ठेवण्यात आले असून त्याद्वारे पोलिसांची लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. न. पं.च्या शहराबाहेरील 40 स्वच्छता कर्मचाऱयांना एसटी व्यवस्था नसल्याने न. पं.च्या ठेकेदारामार्फत त्या कर्मचाऱयांना परवाना घेऊन खासगी वाहनाने आणले जाते. गेले पाच दिवस त्या वाहन चालकाला दंड करण्यात आला. आज वाहतूक पोलिसांनी या वाहन चालकाची चौकशी केल्यानंतर त्याला उद्या तुझी गाडीच जप्त करणार, असा इशारा देण्यात आल्याचा मुद्दा बंडू हर्णे यांनी मांडला. याबाबत संबंधित पॉईंटवरील पोलीस कर्मचाऱयांना सूचना देण्यात येतील, असे चव्हाण यांनी सांगितले. न. पं.च्या स्वच्छता कर्मचाऱयांची नियमित टेंम्परेचर टेस्ट करण्याची सूचना राणे यांनी दिली. सरकारचे लक्ष सध्या मुंबई केंद्रीत असल्याने ग्रामीण महाराष्ट्रात रॅपीड किटचा पुरवठा होत नाही. अमेरिकेपासूनचे देश या टेस्ट करून कोरोना विरोधातील लढा पुढे नेत आहेत. जिल्हा शल्य चिकित्सकांनी मागणी करूनही त्यांना ही किट अद्याप प्राप्त झालेली नाहीत, असे राणे यांनी सांगितले.
जिल्हाधिकाऱयांचे वेधले लक्ष!
विशाल कामत यांनी आईक्रिम पार्लरबाबत मुद्दा उपस्थित केला. या व्यावसायिकांची दुकाने बंद असली, तरी वीजबिल सुरू आहे. त्यामुळे ही दुकाने उघडण्याबाबत पालकमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले. त्यानुसार आज कणकवलीत काही दुकाने उघडण्यात आली. मात्र, डीवायएसपींनी सकाळी ही दुकाने बंद करायला लावली. बांधकामे किंवा रस्त्यांची कामे सुरू असताना त्यासाठी लागणाऱया साहित्याची दुकाने सुरू करण्याबाबत आदेश नसल्याने दुकानदारांमध्ये कारवाईची भीती असल्याचा मुद्दा बंडू हर्णे यांनी मांडला. याबाबत राणे यांनी जिल्हाधिकाऱयांशी दूरध्वनीवर चर्चा केली. यात आईक्रिम पार्लरबाबत कारवाई न करण्यासाठी पोलीस अधीक्षकांशी चर्चा करण्यात येईल, असे त्यांनी सांगितल्याचे राणे म्हणाले.
शहरांमधील नागरिकांची रॅपीड टेस्ट करा!
जिल्हय़ातील आठही शहरांमध्ये प्रत्येक घरातील व्यक्तीची कोरोना रॅपीड टेस्ट करण्याची मागणी जिल्हाधिकाऱयांकडे करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हय़ातील शहरांची स्थिती स्पष्ट होईल. जिल्हय़ात भिलवाडा मॉडेल राबविले, तरच आपण कोरोनापासून निर्धास्त राहण्याच्यादृष्टीने पावले टाकू. यासाठी आवश्यक किट मी उपलब्ध करून देणार आहे. यात पहिल्या टप्प्यात जिल्हय़ातील शहरे घेतल्यानंतर उर्वरित टप्प्यात ग्रामीण भागात ही टेस्ट करण्याच्यादृष्टीने माझे प्रयत्न असल्याचे राणे यांनी सांगितले.









