गुजरातच्या तुरुंगात कैद उत्तरप्रदेशातील माफिया डॉन
वृत्तसंस्था / लखनौ
अंमलबजावणी संचालनालय (ईडी) मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी माफिया डॉन अतीक अहमदच्या विरोधात मोठी कारवाई करणार आहे. अतीकच्या मालमत्ता ईडीकडून जप्त केल्या जाणार आहेत. याकरता प्रयागराज समवेत देशातील अन्य शहरांमधील अतीक अहमदच्या मालमत्तांची माहिती जमविली जात आहे. याचबरोबर त्याच्या 12 बँक खात्यांचा तपशील पडताळून पाहिला जात आहे. माफिया अतीक अहमद सध्या गुजरातच्या साबरमती तुरुंगात कैद आहे.
ईडीने 27 आणि 28 ऑक्टोबरदरम्यान साबरमती तुरुंगात अतीक अहमद याची चौकशी केली होती. यादरम्यान माफिया डॉन बँक खात्यांमधील व्यवहार आणि उत्पन्नाच्या स्रोतांची योग्य माहिती देऊ शकला नाही. अशा स्थितीत आता ईडी त्याच्या मालमत्ता जप्त करण्याची कारवाई सुरू करणार आहे. अंमलबजावणी संचालनालयाने जुलै महिन्यात अतीक अहमद आणि त्याच्या पुत्राच्या विरोधात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा नोंदविला होता.
प्रयागराजमध्ये अतीकची कंपनी एफअँडए असोसिएट, लखनौमध्ये इन्फ्राटेक प्रायव्हेट लिमिटेड आणि इन्फ्रा ग्रीन प्रायव्हेट लिमिटेडबाबत ईडी तपास करत आहे. तर अतीक अहमदच्या पत्नीच्या नावाने संचालित कंपन्यांचीही चौकशी केली जातेय. याचबरोबर ईडीने अतीकचे चार्टर्ड अकौंटंट तसेच निकटवर्तीयांचे जबाब नोंदवून घेतले आहेत. उत्तरप्रदेश सरकारने गँगस्टर कायद्याच्या अंतर्गत अतीक अहमदची सुमारे 355 कोटी रुपयांची मालमत्ता यापूर्वीच जप्त केली आहे.