अनंतपूरमध्ये इमारत कोसळून 3 मुलांसह चौघांचा मृत्यू
वृत्तसंस्था/ विजयवाडा
आंध्रप्रदेश, तामिळनाडू आणि केरळसह दक्षिण भारतात मागील एक आठवडय़ापासून सुरू असलेल्या पावसाने मोठे नुकसान घडविले आहे. आंध्रमध्ये आतापर्यंत पूर-पावसामुळे 17 जणांचा मृत्यू झाला तर 100 हून अधिक जण बेपत्ता आहेत. शुक्रवारी रात्री उशिरा अनंतपूर जिल्हय़ात एक 3 मजली इमारत कोसळली. याच्या ढिगाऱयाखाली चिरडले गेल्यान 3 मुलांसह एका वृद्ध महिलेला जीव गमवावा लागला. तर 4 जण ढिगाऱयाखाली अडकून पडले होते.

तर केरळमध्ये अतिवृष्टीनंतर शबरीमला तीर्थयात्रा एक दिवसासाठी शनिवारी रोखण्यात आली आहे. या निर्णयामुळे भगवान अयप्पाच्या भाविकांमध्ये निराशा पसरली आहे. पट्टनमथिट्टाच्या जिल्हाधिकारी दिव्या एस. अय्यर यांनी जिल्हय़ात सातत्याने पाऊस पडत असल्याने पंबा नदीची पातळी वाढल्याचे म्हटले आहे. पंबा धरणासह जिल्हय़ातील कक्की-अनाथोड धरणातही पाणीसाठा धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचला आहे. प्रशासनाने पात्रानजीक राहणाऱया लोकांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे.
भगवान अयप्पाच्या भाविकांना शनिवारी तीर्थयात्रेवर न जाण्याचे आवाहन जिल्हाधिकारी दिव्या यांनी केले. तर ऑनलाईन बुकिंग केलेल्या भाविकांना हवामान सुधारताच संधी दिले जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
आंध्रप्रदेशच्या कडपा जिल्हय़ात अतिवृष्टीमुळे पूरसदृश स्थिती निर्माण झाली असून 12 जणांचा मृत्यू झाला, तर 18 जण बेपत्ता आहेत. मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी शनिवारी पूरग्रस्त भागांची हवाई पाहणी केली आहे. तर तामिळनाडूच्या वेल्लोर जिल्हय़ात अतिवृष्टीनंतर एक घर जमीनदोस्त झाल्याने 9 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 4 महिला, चार मुले आणि एक पुरुष सामील आहे.









