कारचा पाठलाग करत कोल्हापूरच्या पथकाची कारवाई
प्रतिनिधी / बांदा:
गोवा बनावटीच्या बेकायदेशीर दारू वाहतुकीविरोधात राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर भरारी पथकाने ओटवणे फाटय़ाजवळ गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा वाहतूक करणाऱया कारचा थरारक पाठलाग करून पथकाने कारवाई केली. या कारवाईत 2 लाख 49 हजार 700 रुपयांची दारू व 5 लाख रुपये किमतीची कार असा एकूण 7 लाख 49 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. या प्रकरणी तुषार विनायक तुळसकर (23, रा. न्यू खासकीलवाडा-गावडेशेत) व यशवंत चंद्रकांत कारिवडेकर (23, रा. कारिवडे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागाचे भरारी पथक गस्त घालत असताना बांदा टोलनाका येथील महामार्गावरून कार (एमएच-07/एजी-9006) येत असताना दिसली. त्यावेळी कारला थांबण्याचा इशारा करण्यात आला. मात्र, कार न थांबवताच चालकाने बांद्याच्या दिशेने धूम ठोकली. थरारक पाठलाग करत असताना दारू वाहतूक करणाऱया कारने पथकाच्या वाहनाला धडक दिली. त्यानंतर कट्टा कॉर्नर येथे आली असता ओटवणेच्या दिशेने वळविली. भरारी पथकाने त्या कारचा सुमारे 6 किलोमीटर पाठलाग करून ओटवणे येथे पकडले. कारची तपासणी केली असता त्यात गोवा बनावटीची 2 लाख 49 हजार 700 रुपयांची दारू आढळली. बेकायदेशीर दारू वाहतूक केल्याप्रकरणी दोघांवर कारवाई करण्यात आली. दोघांना दोन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली.
ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्गचे अधीक्षक बी. एच. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक एस. एस. साळवे, दुय्यम निरीक्षक जितेंद्र पवार, कुमार कोळी, सुहास वरुटे, जवान गुरव, अमर पाटील, विशाल भोई, रवींद्र सोनवणे, शिवाजी जाधव यांच्या पथकाने केली. ?









