साडेतीन लाखाचा ऐवज जप्त, कित्तूर पोलिसांची कारवाई
प्रतिनिधी/ बेळगाव
ग्रामीण भागात चोऱया, घरफोडय़ा करणाऱया एका अट्टल गुन्हेगाराला शनिवारी कित्तूर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या जवळून 1 लाख 20 हजार रुपये रोख रक्कम तसेच 69 ग्रॅम सोन्याचे दागिने, 220 ग्रॅम चांदी असा सुमारे साडेतीन लाखाचा ऐवज जप्त करण्यात आला.
शिवानंद कल्लाप्पा हुब्बळी (वय 30, रा. उगरखोड, ता. कित्तूर) असे अटक करण्यात आलेल्या अट्टल गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्या जवळून 69 ग्रॅम सोन्याचे दागिने, 220 ग्रॅम चांदी व 1 लाख 20 हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. कित्तूरचे मंडल पोलीस निरीक्षक मंजुनाथ कुसगल, पोलीस उपनिरीक्षक एस. बी. माविनकट्टी व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली.
शिवानंदने निच्चनकी, हुलीकट्टी, गिरीयाल परिसरात चोऱया केल्याची कबुली दिली आहे. शनिवारी पहाटे कित्तूर येथे त्याला अटक करण्यात आली. कित्तूरला तो चोरीसाठी आला होता. गस्तीवरील पोलिसांनी त्याला हटकले. संशयावरून ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने चोऱया व घरफोडय़ांची कबुली दिली.









