किशोर धुमाळांची धडक कारवाई
प्रतिनिधी/ सातारा
स्थानिक गुन्हे शाखेने देशी बनावटीचे पिस्टल व इतर साहित्य असा एकूण 1 लाख 35 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये दरोडा व खंडणीच्या गुह्यात पाहिजे असलेल्या आरोपीला अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश मिळाले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, सौरभ सुनिल नवले (वय 25 रा. गुंडगे ता. कर्जत), देवदत्त जयपाल कांबळे (वय 23 रा. मुद्रे ता. कर्जत) व अनुराग राजेंद्र पाटील (वय 27 रा. गोळीबार मैदान सातारा) हे तिघे शिर्के पेपर मिल शिरवळ ता. खंडाळा येथे हिरो करिज्मा मोटार सायकलवरून बेकायदेशीर पिस्टल विक्री करण्यास घेवून येणार आहेत, अशी गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना दि. 26 रोजी मिळाली. या माहितीनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे व त्यांच्या पथकास कारवाईचे आदेश दिले. यावेळी स. पो. नि गर्जे व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या पथकाने शिर्के मिल शिरवळ येथे जावून परिसरामध्ये सापळा लावला. यावेळी हे तिघे इसम हिरो करिज्मा मोटार सायकलवरून पुणे बाजूकडून सर्व्हिस रोडने शिर्के पेपर मिलच्या दिशेने येताना दिसल्याने पथकाने त्यांना ताब्यात घेतले. व त्यांच्या अंगझडती घेतली. यावेळी त्यांच्या कब्जात एक देशी बनावटीचे पिस्टल, तीन मोबाईल हॅन्डसेट, हिरो करिज्मा मोटार सायकल असा एकूण 1 लाख 35 हजार 500 रूपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला. पोलिसांनी तो माल हस्तगत करून संशयिताविरूद्ध शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यातील संशयित अनुराग राजेंद्र पाटील याचा शोध शहर पोलीस ठाण्याचे पोलीस एक वर्षापासून करीत होते. त्याला पुढील कारवाईसाठी शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघ, पोलीस हवालदार अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, प्रविण फडतरे, पोलीस नाईक निलेश काटकर, विक्रम पिसाळ, मुनीर मुल्ला, गणेश कापरे, पोलीस कॉन्टेबल रोहित निकम, स्वप्नील दौंड, सचिन ससाणे, वैभव सावंत, मोहन पवार यांनी सहभाग घेतला.