बळजबरीने धर्मांतर : आईच्या आकांताकडे दुर्लक्ष
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकिस्तानात अल्पसंख्याकांची स्थिती कशा प्रमाणात बिकट होत चालली आहे, याचे नवे उदाहरण सिंधच्या एका घटनेतून मिळत आहे. तेथे एका 13 वर्षीय मुलीचे अपहरण करून धर्मांतर करविण्यात आले आणि नंतर 44 वर्षीय पुरुषासोबत तिचा विवाह लावून देण्यात आला. उच्च न्यायालयानेही मुलीला अपहरणकर्त्यांसोबत पाठविण्याचा आणि याप्रकरणी कुणालाच अटक न करण्याचा आदेश दिल्यावर तर याप्रकरणी कळसच झाला आहे. या अन्यायानंतर मुलगी आणि तिच्या आईच्या आकांताची चित्रफित समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहे.
एका ख्रिश्चन कुटुंबातील 13 वर्षीय मुलगी आरजू राजा हिचे अपहरण करून तिचे धर्मांतर घडविण्यात आले. तसेच 44 वर्षीय अली अजहरशी तिचा विवाह लावून देण्यात आला आहे. हे प्रकरण न्यायालयात पोहोचले असता न्यायालयाने मुलीला अपहरणकर्त्यासोबत पाठविण्याचा अजब न्याय केला आहे.
आईचा न्यायासाठी आक्रोश
सुनावणीदरम्यान आरजूची आई रीता मसीह स्वतःच्या मुलीला भेटू देण्याची विनंती करत राहिली. रीता स्वतःच्या मुलील पाहू देण्याची विनंती करत असताना आणि त्यानंतर बेशुद्ध पडत असल्याचे दाखविणारी चित्रफित समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहे.









