प्रतिनिधी / पेडणे
लॉकडाऊनमुळे मुंबईत अडकल्याने गोव्याच्या भूमीत पाय ठेवायला आसुसलेल्या गोव्यातील 40 खलाशांचे काल मंगळवारी रात्री 9.15 वाजता पत्रादेवी चेकनाक्यावर आगमन झाले. या ठिकाणी त्यांची तपासणी झाली. त्यांची व बसची नोंद ठेवून त्यांना पणजीत जाण्यास सोडण्यात आले.
मुंबईहून गोव्यातील खलाशांना घेऊन येणाऱया वाहनांसाठी पत्रादेवी येथे गोवा-महाराष्ट्र सिमेवरील चेकपोस्टवर मोठय़ा प्रमाणात पोलीस तैनात होते. खलाशांना घेऊन येणार असल्याने सायंकाळी 4 वाजल्यापासून स्थानिक पत्रकार त्या ठिकाणी जमले होते. पोलीस अधिकाऱयांसह सरकारी अधिकारीही उपस्थित होते. एकूण 66 खलाशी गोव्यात येणार असे सांगण्यात आले होते, प्रत्यक्षात एसएस नावाच्या आणि एमएच 47 व्हाय 6656 या क्रमांकाच्या बसमधून 40 खलाशी गोव्यात आले आहेत.
चेकनाक्यावर प्रत्येक वाहनाचा परवाना तपासून व त्यांची नोंद पोलीस ठेवत होते. गोव्यातून महाराष्ट्र राज्यात जाणाऱया वाहनांचीही नोंद ठेवण्यात येत असल्याने गेटवर वाहनांची रांग लागली होती.
रोज शेकडो वाहनांची ये-जा सुरू
लॉकडाऊन असले तरी पञादेवी चेकनाक्यावरुन मोठय़ा प्रमाणात वाळू घेऊन जाणारे ट्रक तसेच जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱया गाडय़ा ये जा करत असल्याचे दिसून आले. या सर्व गाडय़ांची या ठिकाणी नोंद ठेवण्यात येत आहे.
दीड महिना हे खलाशी मुंबईत अडकून
मागील सुमारे दीड महिना हे खलाशी मुंबईत अडकून पडते होते. कोरोनाचा कहर या खलाशांनी प्रचंड प्रमाणात झेलला. मारेला डिस्कव्हरी या युरोपियन बोटीतून या खलाशांना मुंबईत आणण्यात आले. कोरोनाच्या भीतीपोटी आणि डिजी शिपिंगच्या निर्णयामुळे हे खलाशी बोटीवर अडकून होते. मात्र कालचा दिवस त्याच्यांसाठी सुवर्ण दिन ठरला आणि अखेर त्यांनी आपल्या मायभूमीत पाय ठेवला.
मुंबईत सर्व प्रकारची प्रक्रिया पूर्ण करून आणि कोविड चाचणी करून या खलाशांना गोव्यात आणण्यात आले. मात्र कर्णिका व आंग्रिया या जहाजांवरील खलाशांना अद्याप मान्यता मिळालेली नाही. रात्री दाखल झालेल्या खलाशांना पाटो पणजी येथील हॉटेल जिंजरमध्ये ठेवण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. आता यानंतर 14 दिवस त्यांना हॉटेलमध्ये कॉरंटाईन करण्यात येणार आहे.









