ऑनलाईन टीम / मुंबई :
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे कोंडीत सापडलेले वनमंत्री संजय राठोड यांनी आज अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला.
बीड जिल्ह्यातील बंजारा समाजाच्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांचे नाव समोर आले होते. या प्रकरणाशी संबंधित काही ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर भाजपकडून राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी वारंवार होत होती. मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने अखेर भाजपने उद्यापासून सुरू होणारे विधिमंडळाचे अधिवेशन चालू न देण्याचा इशारा देणारा दिला होता.
परिणामी आज अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंत्री राठोड यांनी मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर जाऊन आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. मुख्यमंत्री ठाकरे यांनीही हा राजीनामा स्वीकारला.