महापालिकेने राबवली स्वच्छता मोहीम : मागणीची दखल घेतल्याने नागरिकांतून समाधान
प्रतिनिधी / बेळगाव
शहरात पावसाळय़ापूर्वी नाला स्वच्छता मोहीम राबविण्यात येते. मात्र अलीकडे नाल्यामध्ये कचरा टाकण्याचे प्रमाण वाढल्याने नाला स्वच्छता मोहीम वारंवार राबविण्याची गरज आहे. शास्त्राrनगर पहिला क्रॉस ते तिसऱया क्रॉसपर्यंतचा नाला तुडुंब भरला होता. याबाबत महापालिकेकडे पाठपुरावा करण्यात आल्याने नाला स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यामुळे रहिवाशांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
शहराच्या मध्यवर्ती भागामधून नाले वाहत असल्याने पावसाळय़ात नाला तुंबल्यास शास्त्राrनगर, कोनवाळ गल्ली, कपिलेश्वर कॉलनी, महाद्वार रोड, हुलबत्ते कॉलनी, मराठा कॉलनी, इंद्रप्रस्थनगर परिसरातील रहिवाशांना पुराच्या पाण्याचा फटका बसत आहे. नाल्यामध्ये ठिकठिकाणी साचलेला कचरा पावसाळय़ात वाहून एका ठिकाणी अडकून राहतो. परिणामी पाण्याचा निचरा होण्यास अडचण निर्माण होऊन पूरस्थिती निर्माण होते. तसेच नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे पावसाळय़ापूर्वी नाला स्वच्छता मोहीम राबविण्यात येते.
अलीकडे शहरातील नाल्यांमध्ये कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. विशेषतः प्लास्टिक बाटल्या, प्लास्टिक पिशव्या आदी साहित्य टाकण्यात येत असल्याने सदर कचरा साचून रहात आहे. त्यामुळे एरव्ही सर्व नाले कचऱयाने तुडुंब भरून सांडपाण्याचा निचरा होण्यास अडचण निर्माण होत आहे. शास्त्राrनगर पहिला ते तिसऱया क्रॉसपर्यंत नाल्यामध्ये कचरा साचून राहिला होता. त्यामुळे सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नव्हता. तसेच कचरा साचल्याने परिसरात दुर्गंधी पसरून नागरिकांना डासांचा उपद्रव सहन करावा लागत आहे. काही रहिवाशांना आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे नाल्यामध्ये साचलेल्या कचऱयाबाबत ‘तरुण भारत’ने वृत्त प्रसिद्ध करून महापालिकेच्या अधिकाऱयांचे लक्ष वेधले आहे. तसेच शास्त्राrनगर परिसरातील रहिवासी विशाल देशपांडे यांनी नाला स्वच्छतेसाठी महापालिकेच्या अधिकाऱयांकडे पाठपुरावा केला होता. याची दखल घेऊन महापालिकेच्या स्वच्छता विभागाच्या अधिकाऱयांनी नाला स्वच्छता मोहीम राबविली आहे.
नाल्याची स्वच्छता वेळोवेळी करण्याची मागणी…
सदर नाल्यामध्ये साचलेला संपूर्ण कचरा काढून नाला स्वच्छ करण्यात आला. त्यामुळे सांडपाण्याचा निचरा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नाला स्वच्छता मोहीम राबविल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले. अलीकडे कचऱयाचे प्रमाण वाढल्याने नाला स्वच्छता मोहीम सातत्याने राबवावी लागत आहे. त्यामुळे महापालिकेच्या अधिकाऱयांनी नाल्याची स्वच्छता वेळोवेळी करावी, अशी मागणी होत आहे.









