महसूल उपायुक्तपदी प्रशांत हणगंडी यांच्या नियुक्तीचा आदेश
प्रतिनिधी /बेळगाव
महापालिका महसूल उपायुक्त एस. बी. दोडगौडर यांच्या विरोधात जिल्हाधिकाऱयांकडे तक्रार करून कारवाई करण्यासाठी काम बंद आंदोलन छेडण्यात आले होते. अखेर महसूल उपायुक्तांची बदली करण्यात आली असून, महसूल उपायुक्तपदी यादगीर जिल्हय़ाचे उपविभागाधिकारी प्रशांत हणगंडी यांची नियुक्ती करण्याचा आदेश जारी झाला आहे.
महसूल उपायुक्त एस. बी. दोड्डगौडर यांच्या मनमानी कारभाराविरोधात महापालिकेच्या कर्मचाऱयांनी जिल्हाधिकारी तसेच महापालिका आयुक्तांकडे तक्रार केली होती. गेल्या तीन वर्षांपासून मनपात उपायुक्तपदी कार्यरत असलेल्या केएएस श्रेणीतील अधिकाऱयांच्या मनमानी कारभाराला कर्मचारी कंटाळले होते. तसेच फाईलवर सही करण्यास विलंब करणे, चालढकल करणे आणि पैशांची मागणी करणे अशा विविध तक्रारी निवेदनाद्वारे करण्यात आल्या होत्या. फाईलवर सही घेण्यासाठी मुख्य कार्यालयात येणाऱया अधिकाऱयांना व कर्मचाऱयांना ताटकळत ठेवणे व मानसिक त्रास देण्याचा प्रकार चालविला असल्याच्या तक्रारी मनपा कर्मचारी संघटनेच्यावतीने करण्यात आल्या होत्या. तक्रार देऊनही कोणतीच कारवाई करण्यात आली नव्हती.
त्यामुळे कारवाईच्या मागणीसाठी कर्मचारी संघटनेच्यावतीने काम बंद ठेवून महापालिका कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडले होते. अधिकाऱयांची तात्काळ बदली करावी, अशी मागणी करण्यात आली होती. महसूल उपायुक्तांबाबत जिल्हाधिकाऱयांना अहवाल दिला जाईल. पण आंदोलनामुळे नागरिकांना अडचण होण्याची शक्मयता आहे. त्यामुळे आंदोलन मागे घेऊन कामकाज सुरू करा अशी सूचना महापालिका आयुक्त रूदेश घाळी यांनी केली होती. कर्मचाऱयांनी जिल्हाधिकाऱयांची भेट घेऊन निवेदन सादर केल्यानंतर आंदोलन मागे घेतले होते. तसेच महापालिका आयुक्त रूदेश घाळी यांनी जिल्हाधिकाऱयांकडे अहवाल सादर केला होता. तसेच जिल्हाधिकाऱयांनी याबाबतचा अहवाल राज्य शासनाकडे पाठविला होता. त्यानुसार महापालिका महसूल उपायुक्तांची बदली अन्यत्र करण्यात आली आहे. केएएस अधिकाऱयांवर कारवाई करणे किंवा बदली करण्याचा निर्णय स्थानिक पातळीवरील अधिकाऱयांना घेता येत नाही. त्यामुळे राज्य शासनाकडूनच बदलीचा आदेश बजावण्यात आला आहे.
यादगीर जिल्हय़ाचे उपविभागाधिकारी प्रशांत हणगंडी या केएएस श्रेणीतील अधिकाऱयाची बेळगाव महापालिका महसूल उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आल्याचा आदेश जारी करण्यात आला आहे.