वार्ताहर / कुदनूर
मी कोवाडमध्ये आलोय… दहा मिनिटात घरी येतो… मग सर्वजण जेवण करूया… असे सांगून घरी संपर्क साधलेला तरुण अखेर घरी पोहोचलाच नाही. कुदनूर (ता. चंदगड) येथील अनिल यशवंत बामणे (वय 32) या तरुणाने बुधवार दि. 12 ऑगस्ट रोजी रात्री 8.30 वाजता कोवाड (ता. चंदगड) येथून आपल्या घरी फोनवरून अखेरचा संपर्क साधला. मात्र, त्यानंतर त्याच्याशी कोणाचाच संपर्क झाला नाही. त्या घटनेचा कोवाड पोलिसांकडून शोध सुरू आहे.
अनिल बामणे हा गोव्यातील एका औषधनिर्माता कंपनीत कामाला होता. गणेशोत्सवानिमित्त तो आपल्या गावी कुदनूरला बुधवार दि. 12 रोजी तिलारीमार्गे येत होता. तिलारीतून कोवाड येथे आल्यानंतर त्याने आपल्या घरी फोनवरून संपर्क साधला होता. मी कोवाडमध्ये आलोय… दहा मिनिटात घरी येता… मग सर्वजण जेवण करूया… असे सांगून त्याने फोन ठेवला. त्यानंतर घरची सर्व मंडळी त्याची प्रतीक्षा करत बसली. अर्धा तास, तास, दिड तास झाला तरी तो घरी आलाच नाही. मग त्याच्या फोनवर संपर्क साधन्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा फोन बंद अवस्थेत असल्याचे कळले.
त्यानंतर त्याचा भाऊ तसेच मित्र परिवार यांनी कोवाडसह तो ज्या मार्गावरून येत होता तेथेपर्यंत जाऊन शोधाशोध केली. मात्र, त्याचा ठावठिकाणा सापडला नाही. याची कल्पना कोवाड पोलिसांना देण्यात आली असता अनिलच्या फोनचे लोकेशन दुंडगे ते कुदनूर दरम्यान दाखवत असल्याचे आढळले. त्या अनुशंगाने पोलिसांनी शोध मोहीम हाती घेतली आहे. प्राथमिक माहितीनुसार कोवाड पोलिसांनी दुंडगे बंधार्याकनजिक ताम्रपर्णी पात्रात आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने त्याचा शोध सुरू केला आहे. त्या तरुणाच्या बाबतीत नेमके काय घडले आहे? तो तरुण गेला कुठे? त्याचा अपघात झाला आहे काय? असे अनेक प्रश्न परिसरातून उपस्थित केले जात आहेत.
Previous Articleदहावी परीक्षा मराठीतून देणाऱया विद्यार्थ्यांचा टक्का वाढला
Next Article कोल्हापूर जिल्हय़ात कोरोनाचे 12 बळी, 560 पॉझिटिव्ह









