ऑनलाईन टीम / अकोला :
अकोल्याच्या पातूर तालुक्यातील चिखलगाव येथे असलेल्या सम्यक जिनिंग आणि प्रेसिंगला आज पहाटे भीषण आग लागली. या आगीत चार हजार क्विंटल कापूस, दोन हजार क्विंटल सरकी आणि कापसाच्या 50 ते 60 गठाणी जळून खाक झाल्या आहेत. या आगीत अंदाजे दोन कोटींचे नुकसान झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सम्यक ही अकोला जिल्ह्यातील सहकारी तत्वावर चालवली जाणारी सर्वात मोठी जिनिंग फॅक्टरी आहे. कापूस वेगळा करण्याच्या प्रक्रियेतील घर्षण पट्ट्यांमधून ठिणगी उडाल्याने फॅक्टरीत आग लागली. या जिनिंगमध्ये एकूण 46 स्पिनिंग युनिट आहेत. आग लागली तेव्हा जिनिंग कंपनीत 45 मजूर होते. मात्र, ते सर्वजण वेळीच बाहेर पडल्याने कंपनीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणल्यानंतर जिल्हा उपनिबंधकांनी नुकसानाचा आढावा घेतला. त्यानुसार अंदाजे दोन कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.