लंडन / वृत्तसंस्था
भारतीय महिला टेनिसपटू अंकिता रैनाचा विम्बल्डनच्या मुख्य ड्रॉमध्ये पात्र होण्याचा प्रयत्न अपयशी ठरला आहे. पात्रता स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत अंकिताला धक्कादायक पराभव पत्करावा लागला. 28 वर्षीय अंकिताला अमेरिकेच्या व्हरवरा लेपचेंकोने 3-6, 6-7 अशा सरळ सेट्समध्ये सहज पराभूत केले. ही लढत 1 तास 22 मिनिटे चालली होती. पहिल्या सेटमध्ये सर्व्ह आपल्याकडे कायम राखता न आलेल्या अंकिताला दुसऱया सेटमध्ये देखील निर्णायक क्षणी अपयशाचा सामना करावा लागला. जागतिक क्रमवारीत 182 व्या स्थानी असलेल्या अंकिताला या लढतीत केवळ एक ब्रेकपॉईंट मिळाला आणि याचा देखील ती लाभ घेऊ शकली नाही. पुरुषांच्या पात्रता फेरीत भारताचा रामकुमार रामनाथन दुसऱया फेरीत पोहोचला. मात्र, प्रज्ञेश गुणेश्वरनचे आव्हानही मंगळवारी संपुष्टात आले.









